Thu, May 23, 2019 14:42
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › ‘टेंभू’साठी १२०० कोटी मंजूर

‘टेंभू’साठी १२०० कोटी मंजूर

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 11:01PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

टेंभू योजनेच्या नुकतीच सुधारित अंदाजपत्रकास केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाली. या योजनेसाठी 1200 कोटी रुपयांची तरतूद झाल्याचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. दोन वर्षांत योजनेचे काम पूर्ण होईल, असे ते म्हणाले. यावेळी भाजपचे प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, अरविंद तांबवेकर, विक्रम सवर्डेकर, गजेंद्र कुल्लोळी उपस्थित होते.

ते म्हणाले,  केंद्र शासनाच्या नियोजन आराखड्यामध्ये 3 हजार 700 कोटी रुपयांची तरतूद दुष्काळी तालुक्यांसाठी तर 6 हजार कोटी रुपये अतिआवर्षणग्रस्त भागातील सिंचन योजनांसाठी नियोजित होते. नुकताच या खात्याचा पदभार केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे गेला आहे. गडकरी यांनी या निधीत वाढ करून 8 हजार कोटी दुष्काळी आणि आत्महत्याग्रस्त पुनर्वसनासाठी 11 हजार कोटी रुपयांची तरतूद करून सुधारित अंदाजपत्रक तयार केले आहे.या सुधारित अंदाजपत्रकामध्ये टेंभू योजनेसाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

खा. पाटील म्हणाले, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाला नाबार्डकडून कर्जाच्या स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निधीतून येणार्‍या दोन वर्षांत टेंभू योजना पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. 

पाटील म्हणाले, ताकारी-म्हैसाळ योजनेचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश करून 1450 कोटी रुपये मंजूर केले आहेत. तो निधीही आला आहे. अर्थात याची कामे केवळ वाळू नसल्याने विलंबावर पडली. वाळू उपाशाला बंदी असल्याने ही अडचण झाली आहे. तरीही शासनाकडून जप्त केलेली वाळू या योजनेसाठी शासन दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  

पाटील म्हणाले, पाणी योजनेच्या वीजबिलाचा प्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पाचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी साडेचार कोटी रुपयांमध्ये एक मेगावॅट वीज निर्मिती होऊ शकते. त्यादृष्टीनेही प्रकल्प उभारण्यासाठी जागा देण्यात येईल.