Wed, May 22, 2019 17:09होमपेज › Sangli › मुख्याध्यापक पदोन्नती 120 शिक्षकांनी नाकारली

मुख्याध्यापक पदोन्नती 120 शिक्षकांनी नाकारली

Published On: Mar 07 2018 12:16AM | Last Updated: Mar 06 2018 11:19PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडील 120 शिक्षकांनी वरिष्ठ मुख्याध्यापक पदोन्नती नाकारली आहे. पदोन्नतीने गैरसोयीचे ठिकाण (शाळा) मिळण्यापेक्षा शिक्षक पद बरे, असा पवित्रा घेत या शिक्षकांनी पदोन्नती नाकारली. 74 शिक्षकांनी पदोन्नती स्विकारली आहे. पदोन्नती नाकारल्याने 22 पदे रिक्त राहिली आहेत. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडील मराठी माध्यमाची वरिष्ठ मुख्याध्यापकाची 96 पदे रिक्त होती. सेवाज्येष्ठतेने पदोन्नतीसाठी 194 शिक्षकांची यादी तयार करण्यात केेली होती. पदोन्नतीसाठी या सर्व 194 शिक्षकांना समुपदेशनासाठी बोलवले होते. जिल्हा परिषदेत मंगळवारी समूपदेशन झाले. 

मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) दीपाली पाटील, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे तसेच पंचायत समितींचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. मंगळवारी 194 शिक्षकांचे समुपदेशन झाले. पदोन्नतीची 96 पदे होती. पैकी 74 शिक्षकांनी पदोन्नती स्विकारली. 120 शिक्षकांनी पदोन्नती नाकारली. गैरसोयीच्या ठिकाणच्या वरिष्ठ मुख्याध्यापक होण्यापेक्षा सध्या सोयीच्या ठिकाणी उपशिक्षक म्हणून कार्यरत राहण्याला या शिक्षकांनी पसंती दिली. विस्तार अधिकारी पदोन्नती शनिवारी होणार असल्याचे सांगण्यात आले.