Sun, Mar 24, 2019 16:45होमपेज › Sangli › पदोन्‍नती नाकारलेल्या 120 शिक्षकांना तीन वर्षे ‘बॅन’

पदोन्‍नती नाकारलेल्या 120 शिक्षकांना तीन वर्षे ‘बॅन’

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 12 2018 11:20PMसांगली : प्रतिनिधी

वरिष्ठ मुख्याध्यापक पदोन्नती नाकारलेल्या 120 शिक्षकांना पदोन्नतीसाठी 3 वर्षे ‘बॅन’ राहणार आहे. पदोन्नतीसाठी ते आता 3 वर्षांनी पात्र ठरणार आहेत. पदोन्‍नती नाकारणार्‍यांचा आश्‍वासित प्रगती योजनेचा लाभ काढून घेतला जाणार आहे. शासनाच्या दि. 12 सप्टेंबर 2016 च्या निर्णयानुसार कार्यवाही करावी लागणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी दिली. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडील 120 शिक्षकांनी वरिष्ठ मुख्याध्यापक पदोन्‍नती नाकारली आहे. पदोन्नतीने गैरसोयीचे ठिकाण (शाळा) मिळण्यापेक्षा शिक्षक पद बरे, असा पवित्रा घेत बहुसंख्य शिक्षकांनी पदोन्‍नती नाकारल्याचे समजते.  पदोन्‍नती नाकारल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडील वरिष्ठ मुख्याध्यापकांची 22 पदे रिक्‍त राहिली आहेत. 

पदोन्‍नती नाकारल्यामुळे उद्भवणारे परिणाम व त्याबाबत अंवलंबण्याची कार्यवाही यासंदर्भात दि. 12 सप्टेंबर 2016 रोजी शासन निर्णय जारी झाला आहे. या शासन निर्णयात म्हटले आहे की, वरच्या संवर्गात पदोन्‍नतीसाठी निवड झाल्यानंतर अथवा तत्पूर्वीच एखाद्या कर्मचार्‍याने पदोन्‍नतीचे पद स्वीकारण्यास नकार दर्शविल्यास त्याचे नाव पदोन्‍नतीसाठी पात्र असणार्‍या निवडयादीतून काढून टाकण्यात यावे. पुढील दोन वर्षी होणार्‍या निवडसूचींमध्ये त्यांच्या नावाचा विचार न करता तिसर्‍या वर्षाच्या निवडसूचीत संबंधितास पदोन्‍नतीची पात्रता तपासावी व पदोन्‍नतीस पात्र ठरल्यास निवडसूचीत समावेश करावा. कायमस्वरुपी पदोन्‍नती नाकारली असल्यास त्यांचा पुढील कोणत्याही निवडसूचीकरिता विचार करू नये. पहिल्या वेळेस पदोन्‍नती नाकारल्यानंतर 3 वर्षानंतर दुसर्‍या वेळेस निवडसूचीकरिता (पदोन्नती) विचार करण्यात यावा. संबंधिताने पुन्हा पदोन्‍नतीस नकार दिल्यास त्यांचा त्या निवडसूचीत व त्यापुढील दोन वर्षांच्या निवडसूचीत विचार करण्यात येणार नाही. पदोन्नती नाकारलेल्यांना (अधिकारी, कर्मचारी) आश्‍वासित प्रगती योजनेंतर्गत लाभ दिले असल्यास ते काढून घेण्यासंदर्भात वित्त विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करावी.