Thu, Jul 18, 2019 21:24होमपेज › Sangli › 12 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात

12 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 11:37PMसांगली : प्रतिनिधी  

महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील 12 नगरसेवक शिवसेनेत येण्यासाठी संपर्कात आहेत. त्याबाबत  लवकरच निर्णय होईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान राज्यातील सेना - भाजपचे सरकार पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करेल.   शिवसेना त्यांचा पाठिंबा काढून घेणार नाही, मात्र त्यानंतर येणार्‍या निवडणुकीत शिवसेना स्वबळावरच लढेल, असेही त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले,   काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता आहे. मात्र भाजप-शिवसेना युती होणार नाही.  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशभर शिवसेना लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढेल, असे जाहीर केले आहे. येथे आम्ही पहिल्यांदाच लढत असलो तरी ताकद वाढली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने अजिबात विकास केलेला नाही. मुलभूत प्रश्न तसेच आहेत. इथे लोकांना सक्षम पर्याय हवाय. आम्ही मुंबई, ठाण्यासारख्या महापालिकांमध्ये अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या आहेत. त्या धर्तीवर सांगलीकरांनाही चांगल्या सुविधा देऊ.   

ते म्हणाले, भाजपने शिवसेनेचा सन्मान केला नाही. आम्ही युतीच्या शासनात गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्रीपद दिले होते. आता भाजपने शिवसेनेच्या ताकदीप्रमाणे स्थान दिले नाही. केंद्रात 21 जागा असताना दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद द्यायला हवे होते. 34 राष्ट्रीयकृत बँकांवर त्यांनी संचालक नेमले. त्यात सेनेला स्थान नाही. महामंडळावरील नियुक्त्या परस्पर केल्या जात आहेत. महाराष्ट्रात शिवसेना भक्कम आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे लढून राज्यात सत्ता मिळवू, हाच आमचा निर्धार आहे.शिवप्रतिष्ठान शिवसेनेसोबत असेल का, या प्रश्नावर किर्तीकर म्हणाले, शिवप्रतिष्ठान आणि आमचा इथे संबंध नाही. निवडणुकीच्या राजकारणात त्यांनी आमच्यासोबत यावे, असा कुठलाही विषय नाही.” 
यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभुते, जिल्हा संघटक बजरंग पाटील,  शंभोराज काटकर, शहरप्रमुख मयूर घोडके, अमोल पाटील, सुनीता मोरे आदी उपस्थित होते.