Tue, Jun 18, 2019 23:18होमपेज › Sangli › कर्जमाफी आणखी 10 टक्के शेतकर्‍यांना!

कर्जमाफी आणखी 10 टक्के शेतकर्‍यांना!

Published On: Jul 22 2018 12:59AM | Last Updated: Jul 21 2018 11:40PMसांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आता कुटुंब हा घटक न मानता व्यक्ती हा घटक मानन्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आणखी सुमारे 10 टक्के शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. ‘ओटीएस’मधील काही थकबाकीदार शेतकरी दीड लाखांपर्यंतच्या कर्जमाफीस पात्र ठरतील असे सुत्रांनी सांगितले. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंर्तगत आतापर्यंत 1 लाख 14 हजार 586 शेतकर्‍यांना 259 कोटी 55 लाख रुपयांचा लाभ झाला आहे. यामध्ये दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफ झालेले शेतकरी 27 हजार 543 आहेत. त्यांच्या कर्जमाफीची रक्कम 102 कोटी रुपये आहे. जिल्ह्यातील 3 हजार 174 शेतकर्‍यांनी ओटीएसचा लाभ मिळाला आहे. थकबाकीतील दीड लाखावरील रक्‍कम भरल्यास दीडलाखाचे कर्ज माफ होणार होते. त्यानुसार ओटीएसमधील 3 हजार 174 शेतकर्‍यांनी 13 कोटी रुपये भरले असून त्यांचे 28.67 कोटी रुपयांचे कर्जमाफ झालेले आहे. सर्वांधिक 83 हजार 869 शेतकरी प्रोत्साहन अनुदानाचे लाभार्थी आहेत. त्यांना 128 कोटी 89 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान मिळाले आहेे. 

दरम्यान कर्जमाफी योजनेसाठी कुटुंब हा घटक मानला होता.  कुटुंबातील पती, पत्नी व अठरा वर्षाखालील मुले हे एक कुटुंब मानले होते. या कुटुंबातील सदस्यांचे एकत्रित थकित कर्ज दीड लाखांपर्यंत असेल तर कर्जमाफी व दीड लाखावर असेल तर ओटीएससाठी पात्र होते. दरम्यान आता राज्य मंत्रीमंडळाने कर्जमाफी योजनेंतर्गत लाभासाठी कुटुंबाऐवजी व्यक्ती हा घटक मानन्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आणखी सुमारे 10 टक्के शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ होण्याचे संकेत जिल्हा बँकेतून देण्यात आले. ‘ओटीस’साठी पात्र असलेले व अद्याप योजनेत सहभाग न घेतलेल्या 3 हजार 677 पैकी अनेक शेतकर्‍यांना व्यक्ती हा घटक केल्याने कर्जमाफीचा लाभ होण्याचे संकेत मिळत आहेत.