Thu, Apr 18, 2019 16:08होमपेज › Sangli › जिल्हा बँक नफ्यातून शेतकर्‍यांना 10 कोटी

जिल्हा बँक नफ्यातून शेतकर्‍यांना 10 कोटी

Published On: May 29 2018 1:31AM | Last Updated: May 28 2018 9:52PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा बँकेला सन 2017-18 या आर्थिक वर्षात झालेल्या 72.83 कोटी रुपयांच्या नफ्यातून शेतकर्‍यांना पीक कर्जावर 2 टक्के व्याज रिबेटसाठी 10 कोटी, आयकरसाठी 30 कोटी, विकास सोसायट्यांना 14 कोटी, बँक कर्मचार्‍यांना एक पगार बक्षिस व एक पगार बोनससाठी 7 कोटी, शेती स्थिरता निधीसाठी 3.75 कोटी आणि राखीव निधीसाठी 6.25 कोटी रुपये तरतूद करण्याचा निर्णय सोमवारी जिल्हा  बँक संचालक मंडळ सभेत झाला. 

जिल्हा बँकेत सोमवारी संचालक मंडळ सभा झाली. अध्यक्षस्थानी दिलीपराव पाटील होते. उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, संचालक विलासराव शिंदे, मोहनराव कदम, मानसिंगराव नाईक, विशाल पाटील, सी. बी. पाटील, उदयसिंह देशमुख, डॉ. सिकंदर जमादार, बी. के. पाटील, सुरेश पाटील, डॉ. प्रताप पाटील, गणपती सगरे, बाळासाहेब होनमोरे, श्रद्धा चरापले, कमलताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, सरव्यवस्थापक बी. एम. रामदूर्ग, मानसिंगराव पाटील, व्यवस्थापक जे. जे. पाटील, सुधीर काटे, सतीश भोसले  उपस्थित होते. 

3 लाखांपर्यंतचे कर्ज ‘0’ टक्केने; लाभासाठी 30 जूनपर्यंत संधी

जिल्हा बँकेने सन 2017-18 मध्ये 920 कोटी रुपयांचे कर्जवाटप झालेले आहे. वेळेत परतफेड केलेल्या शेतकर्‍यांना 1 लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के, तर 1 लाख ते 3 लाखांपर्यंतचे कर्ज 2 टक्के व्याजदराने मिळते. 1 ते 3  लाखांपर्यंतचे कर्ज 2 टक्क्यांऐवजी शून्य टक्के व्याजाने मिळावे यासाठी शेतकर्‍यांना 2 टक्के व्याज रिबेट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाने घेतला. या निर्णयामुळे सुमारे 60 हजार शेतकर्‍यांना 10 कोटींचा लाभ होणार आहे. 30 जून 2018 पर्यंत वेळेत परतफेड केलेले शेतकरी पात्र आहेत. 

बँक कर्मचारी, सचिव बक्षिस

बँक कर्मचार्‍यांना एक पगार बक्षिससाठी 3.50 कोटी व दिवाळी बोनससाठी 3.50 कोटी तरतुद करण्याचा निर्णय झाला. बँक कर्मचार्‍यांना कॅश क्रेडीटची मर्यादा 10 लाखांवरून 15 लाख रुपये केली आहे. त्यावरील व्याज 11 टक्क्यांवरून 10.50 टक्के केले आहे. सोसायटींच्या सचिवांनाही एक पगार बक्षिस दिला जाणार आहे. 

सोसायट्यांना 14 कोटी

विकास सोसायट्यांना 12 टक्के लाभांश व 3 टक्के संस्था विकास निधी दिला जाणार आहे. त्यासाठी बँकेच्या नफ्यातून 14 कोटी रुपयांची तरतुद होणार आहे. व्यस्त तफावतीत असणार्‍या सोसायट्यांना मदतीसाठी बँकेने कॉर्पस फंड तयार केला आहे.या फंडात 3.50 कोटी रुपये आहेत. व्यस्त तफावतीतील सोसायट्यांनी सुमारे 10 लाखांपर्यंतचा निधी 5 ते 10 वर्षांपर्यंत बिनव्याजी दिला जाणार आहे. 
सोसायटी संगणकीकरणासाठी निधीबाबतही संचालक मंडळात चर्चा झाली. 

50 कोटी रोखे खरेदी; 9 टक्के  व्याजदर

जिल्हा बँक 50 कोटी रुपयांचे बॉण्डस् (रोखे) खरेदीचा प्रस्ताव आरबीआयला सादर करणार आहे. या रोख्यांमध्ये 5 ते 10 वर्षांसाठी गुंतवणुकीला 9 टक्के व्याजदर मिळणार आहे. गुंतवणुकदारांना अधिक व्याजदर मिळणार आहे. बँकेचा ‘सीआरएआर’ही  सुधारणार आहे. 

जिल्हा बँकेच्या 73 कोटींची नफा विभागणी 

पीक कर्ज शुन्य टक्केसाठी 2 टक्के व्याज रिबेट : 10 कोटी रुपये

विकास सोसायट्यांना 12 टक्के लाभांश, 3 टक्के विकास निधी : 14 कोटी रु. 

आयकर तरतूद : 30 कोटी रुपये  

राखीव निधी : 6.25 कोटी रुपये

जिल्हा बँक कर्मचार्‍यांना 1 पगार बक्षिस व 1 पगार बोनस : 7 कोटी रुपये

शेती पतस्थिरता निधी : 3.75 कोटी रुपये.