Fri, Apr 26, 2019 19:57होमपेज › Sangli › ‘कृषी’च्या 1.47 कोटींच्या योजनांना मंजुरी

‘कृषी’च्या 1.47 कोटींच्या योजनांना मंजुरी

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 10 2018 11:14PMसांगली: प्रतिनिधी

कृषी साहित्य अनुदानाच्या 1.47 कोटी रुपयांच्या योजनांना जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली. आटपाडी नगरपंचायतसाठी ठरावही मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिली. 

जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा शुक्रवारी वारणावती येथे झाली. अध्यक्षस्थानी संग्रामसिंह देशमुख होते. उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती अरूण राजमाने, तम्मनगौडा रवि-पाटील, प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, ब्रह्मदेव पडळकर, सदस्य डी. के. पाटील, संभाजी कचरे, अर्जुन माने-पाटील, नवले, सुरेखा आडमुठे, सुनीता पवार, अश्‍विनी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे तसेच खातेप्रमुख उपस्थित होते. 

शेतकर्‍यांना कृषी साहित्यासाठी अनुदान देण्याच्या योजनांना मंजुरी देण्यात आली. पॉवर टिलर खरेदीसाठी शेतकर्‍यांना ठोक स्वरुपात 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.त्यासाठी 50 लाखांची तरतुद आहे. चाफकटर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी 20 लाखांची तरतुद केली आहे. पेट्रोकेरोसिन इंजिनसाठी 27 लाखांची तरतुद आहे. पाच अश्‍वशक्ती व तीन अश्‍वशक्ती विद्युत पंप खरेदीसाठी शेतकर्‍यांना 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी 50 लाखांची तरतुद आहे. या सर्व योजनांचे अनुदान थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग होणार आहे. आटपाडी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्यासाठी पंचायत समितीकडून आलेल्या प्रस्तावास जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली. 

देशमुख म्हणाले, देशातील सर्व जिल्ह्यांचे स्वच्छताविषयक गुणांकन ठरविण्यासाठी ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018’ अंतर्गत शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, मंदिरे, यात्रास्थळे तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणारी सर्व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता महत्वाची आहे. त्यासाठी सर्व घटकांचे योगदान आवश्यक  आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2018 हे अ‍ॅप डाऊनलोड करून महाराष्ट्र राज्य व सांगली जिल्हा निवडून विचारलेल्या 4 प्रश्‍नांना उत्तर देऊन जिल्ह्याचे गुणांकन वाढवावे. देशातील स्वच्छ जिल्हा निवडण्यास व ‘स्वच्छ जिल्हा, सांगली जिल्हा’ या मोहिमेस लोकप्रतिनिधी, अधिकारी, जनतेने सहकार्य द्यावे, असे आवाहनही देशमुख यांनी केले.