Tue, Aug 20, 2019 15:47होमपेज › Sangli › जत नगरपालिकेला भाजपच्या नगरसेवकांनी ठोकले टाळे

जत नगरपालिकेला भाजपच्या नगरसेवकांनी ठोकले टाळे

Published On: Apr 26 2019 2:53PM | Last Updated: Apr 26 2019 2:36PM
जत :  प्रतिनिधी

जत शहरात गेल्या आठ ते दहा दिवसापासून पाणीपुरवठा  मिळत नाही. पाणीपुरवठा करताना अनियमितपणा केला जातो. शुक्रवारी विरोधी पक्षनेते विजय ताड यांच्यासह कार्यकर्त्यांनी भेट दिली. यावेळी मुख्याधिकारी व कर्मचारी हजर नव्हते. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेला कुलुप घालून नगरपालिकेसमोर आंदोलन केले. 

जत शहरात ५० ते ६० हजार लोकसंख्या आहे. या शहराला बिरनाळ तलावातून पाणीपुरवठा होतो. बिरनाळ तलावात मोठ्या प्रमाणात पाणी असतानाही नगरपालिकेच्या  अनागोंदी कारभारामुळे आठ ते दहा दिवस पाणी येत नाही. याबाबत भाजपच्या नगरसेवकांनी अनेक वेळा  मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, निवडणुकीचे कारण सांगून मुख्याधिकारी हे टाळाटाळ करतात.

नगरसेवक विरोधी पक्षनेते विजय ताड, प्रवीण वाघमोडे, संतोष मोटे, अजिंक्य सावंत यांनी  नगरपालिकेला भेट दिली. यावेळी मुख्याधिकारी यांच्यासह अनेक कर्मचारी बेपत्ता होते. पाण्याचा प्रश्‍न सांगायचा कुणाला हा प्रश्न उपस्थित झाला. यावेळी नगरपालिकेला टाळे ठोकले. राजेंद्र शिंदे, चिनू बल्लारी, आप्पा शिंदे, अमित शेख, रघुनाथ भोसले, सद्दाम आतार, सागर माळी, रोहित माळी, शरद भोसले, हर्षद कुकडे, योगेश पाटील आदी उपस्थित होते. 

यावेळी विजय ताड म्हणाले, जत नगरपालिकेचा कारभार बिघडला असून सत्ताधारी याकडे लक्ष देत नाहीत. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत हराळे हे सुद्धा अनेक वेळा बेपत्ता असतात. त्यांच्याकडे अनेक तक्रार करूनही ते दुर्लक्ष व वेळकाढूपणा  करतात. पाणीटंचाईने रौद्ररूप धारण केले असताना देखील  शहरात दहा  ते बारा दिवस पाणी येत नसल्याने अनेक नागरिकांचे हाल होत आहे. अनेक हातपंप नादुरुस्त अवस्थेत आहे. हे पंप  दुरुस्त करण्याकरिता कर्मचारी देखील उपलब्ध आहेत. पण ते मात्र करत  नाहीत ही बाब निदर्शनास आली आहे.  शहरातील कचरा सुद्धा उचलला जात नाही त्यामुळेच आम्ही आज नगरपालिकेला घालून आमचे आंदोलन सुरू असल्याचे सांगितले.