होमपेज › Pune › प्राणिगणनेचीच झाली शिकार 

प्राणिगणनेचीच झाली शिकार 

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 1:40AMसारोळा : वैभव धाडवे पाटील

भोर उपवनविभाग कार्यालयाची नुकतीच झालेली वन्यजीवगणना निष्फळ ठरली आहे. कारण गणनेदरम्यान जीपीएस रीडिंग घेतले नसल्याने ही गणना व्यर्थ मानली जाणार आहे. वनपाल व वनरक्षकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारल्याने वन्यजीव गणनेवर परिणाम झाला. एकंदरीत मोठी सामग्री वापरून करण्यात आलेल्या प्राणीगणनेचीच शिकार झाली आहे. याचाच दुष्परिणाम सोमवारी (दि. 12) तीन बिबट्या व 30 कावळ्यांचा प्राण गमावण्यात दिसून आला आहे.

भोर उपवनविभाग कार्यालयांतर्गत भोर, नसरापूर, वेल्हा व पुरंदर असे चार वन परिक्षेत्र येतात. यामध्ये दि. 20 ते25 जानेवारी दरम्यान वन्यजीवगणनेचा कार्यक्रम कसाबसा आटोपला. वन्य प्राणी, त्यांची विष्ठा, पावलांचे ठसे आदींवरून माहिती नोंदविली जाते. मात्र ही माहिती नोंदविली का, हा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. 

वन विभागाची ही गणना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही गणना फुसकी ठरली आहे. मागील वर्षी महत्त्वाच्या गोष्टीच झाल्या नसल्याने हे रेकॉर्ड अपुरे मानले जाते. परिणामी आता पुन्हा रात्रंदिवस परिश्रम करून पुन्हा पाणवठे, तसेच विविध क्षेत्रांत जागून काम करावे लागणार आहे. ही योजना निष्फळ ठरली आहे, असे उपवनविभाग अधिकारी जाधव यांनी सांगितले. पुन्हा गणनेची तयारी करणार असल्याचे सांगितले. 

वन्यजीव गणना निष्फळ ठरल्याने आता पुन्हा दुसर्‍यांदा गणनेची तयारी सुरू करणार आहे. वन्यजीव गणना म्हणजे साधीसोपी गोष्ट नसते. यासाठी खूप काटेकोर नियोजन केले जाते. पहिल्या गणनेची आकडेवारी आता दुसर्‍या गणनेशी जुळण्याची शक्यतासुध्दा कमी असते, पण या वेळी तरी गणना गंभीरपणे केली जाणार का, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.