Thu, Apr 25, 2019 11:27होमपेज › Pune › राज्य अनुभवणार आजपासून ‘शून्य सावली’ दिवस

राज्य अनुभवणार आजपासून ‘शून्य सावली’ दिवस

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 07 2018 1:41AMपुणे : प्रतिनिधी

राज्य सोमवारपासून टप्प्याटप्प्याने शून्य सावली दिवस अनुभवणार आहे. सूर्य आपल्या डोक्यावर असताना भरदुपारी 12 वाजल्यानंतर सावली गायब होणार आहे. वर्षातून दोनदा उद्भवणारी ही स्थिती संपूर्ण राज्यातील नागरिकांना अनुभवता येणार आहे. नागरिक कितीही उन्हात थांबले तरीदेखील त्यांना आपली सावली दिसणार नसल्याची माहिती देण्यात आली. 26 मेपर्यंत राज्यातील नागरिक याचा अनुभव घेऊ शकणार आहेत.

पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागात, तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. परंतु, या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. शून्य सावलीचा हा एक रोमांचकारी अनुभव असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून साडेतेवीस अंशांनी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात आणि सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायण होते. दररोज सूर्योदयाची किंवा सूर्यास्ताची क्षितिजावरची जागा बदलत असते. सुमारे 23 डिसेंबर ते 21 जून सूर्याचे उत्तरायण असते, तर त्यानंतर दक्षिणायण असते. 
या दरम्यान दोन असे दिवस येतात  की, मध्यान्हावेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. त्यावेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली असते आणि काही वेळासाठी ती नाहीशी होते, अशी माहितीदेखील ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञांनी दिली आहे.

आपल्या शहरातील शून्य सावली दिवस
 

7 मे - कोल्हापूर, सांगली, मिरज, 10 मे - सातारा, अक्‍कलकोट, 11 मे - वाई, महाबळेश्‍वर, 12 मे - बार्शी, बारामती, 13 मे - लातूर, 14 मे - पुणे, दौंड, अलिबाग, 15 मे - मुंबई, 16 मे - नगर, कल्याण, नांदेड, ठाणे, 18 मे - पैठण, 19 मे - जालना, 20 मे - औरंगाबाद, नाशिक, 21 मे - मनमाड