Thu, Apr 25, 2019 03:34होमपेज › Pune › तरुणांमध्ये दाढी मिशीची क्रेझ

तरुणांमध्ये दाढी मिशीची क्रेझ

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 14 2018 12:27AMपिंपरी : पूनम पाटील

एकेकाळी वाढलेले केस आणि वाढलेली दाढी हे दुःखात असल्याचे लक्षण मानले जायचे. परंतु, हल्ली हा ट्रेंड बदलला असून, नव्यानेच तारुण्यात पदार्पण करणार्‍या मुलांमध्ये दाढी व मिशा ठेवण्याची फॅशन आली आहे. आता तरुणांमध्ये चिकणी दाढी हा फॅशनलुक जाऊन त्याऐवजी पिळदार मिशा आणि दाढीची क्रेझ आली आहे. 

आजकालच्या तरुणांकडे नजर टाकली तर पिळदार मिशा व टोकदार दाढी असा रुबाबदार चेहरा नजरेस पडतो. प्रत्येकाच्या दाढीची वेगवेगळी स्टाईल आहे. पूर्वीची क्‍लीन शेव्हची फॅशन आता मागे पडली असून क्रिकेटरपासून सेलिब्रेटीजसह सर्वसामान्य तरुण देखील दाढी मिशा ठेवण्यावर भर देत आहे.

‘महाराज शेव्हींग कट’चाच बोलबाला

महाराज शेव्हिंग कट, रणवीर सिंगची बाजीराव फिल्ममधील मिशीची स्टाईल, मस्केटीयर स्टाइल, व्हॅन डिक लूक, वाइल्ड वेस्ट स्टाइल अशा विविध स्टाईल्स तरुणांना आकर्षित करत आहेत. यात जास्तकरुन छत्रपती शिवरायांसारखे दिसण्यासाठी महाराज शेव्हींग कट करण्याकडे सध्या तरुणाईचा अधिक कल आहे. अगदीच नुकतेच मिसरुढ फुटलेली मुले सुध्दा या लुकलाच पसंती देत आहे. तरुणांना सध्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची भुरळ असल्याने या दाढीमिशीची फॅशन जास्तच रुढ होत आहे. 

वाढलेली दाढी शिवरायांप्रमाणे सेट करुन त्यात स्टायलिश कपड्यांवर चंद्रकोरीचा टिळा लावला जातो. विशेष म्हणजे हा ट्रेंडी टिळा आणि दाढीच्या वेगळ्या लुकमधील फोटो सोशल मिडीयावर टाकल्यावर  हजारो लाईक्स मिळत आहेत. सध्या तरुण पिढी याला ‘महाराज शेव्हिंग कट’ म्हणून आवडीने ‘फॉलो’ करत आहेत. या खालोखाल मस्केटीयर स्टाइल, व्हॅन डिक लूक हा ‘अँटनी व्हॅन डिक’ या कलाकाराच्या प्रसिद्धीनंतर ही प्रसिद्ध झाली. जाडसर मिशांबरोबर फार जाड गोटी स्टाइल दाढीचीही फॅशन मुलांना आकर्षित करतेय. दाढी आणि मिशीचा स्टायलिश लुक सिनेमामधून आता तरुणांच्या चेहर्‍यावर दिसू लागला आहे.  टी-20, आयपीएलपासून ते प्रो-कबड्डीच्या खेळाडूंपर्यंतच्या प्रत्येकाच्या दाढी-मिशांच्या स्टाइल्स तरुणाई अगदी बारकाईने कॉपी करत आहेत.  

सोशल मीडियावरील स्पर्धेमुळे भुरळ

स्वत:ला व्यक्‍त करण्यासाठी हा एक वेगळा मार्ग तरुणाईने चोखळला असून, ‘मुछ नही तो कुछ नही’ अशी विविध वाक्ये आता कानी पडत आहेत. ठसठशीत व देखणे दिसावे यासाठी देखणा दाढीवाला या स्पर्धेबाबत बोलायलाच हवे. दाढीमिशा ठसठशीतपणे कोरून लूक अधिक मॅनली करत दाढी मिशांमध्ये स्टाइल सेन्स जपण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. सोशल मिडीयावर अशा दाढीवाल्या देखण्यांसाठी खास स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तेव्हापासून पुरुषांनीही दाढीमिशांचं अप्रुप वाटत असून दाढी मिशा ठेवण्याचा ट्रेंड जास्त रूढ होताना दिसतोय.