Thu, Jul 18, 2019 14:25होमपेज › Pune › बाबर शिवसेना शहर प्रमुख

बाबर शिवसेना शहर प्रमुख

Published On: Jan 17 2018 2:02AM | Last Updated: Jan 17 2018 1:03AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

शिवसेनेच्या पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची नियुक्ती निश्‍चित असल्याचे ‘पुढारी’ने दिलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे  शिवसेनेचे सचिव  खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या पत्रकात बाबर यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.

गेल्या चार वर्षांपासून राहुल कलाटे यांच्याकडे शिवसेना शहरप्रमुखपद होते.  पालिका निवडणुकीनंतर त्यांच्याकडे सेनेचे गटनेतेपद आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी शहर प्रमुखपदातून मुक्त करण्याची विनंती त्यांनी पक्षाकडे केली होती. शहर प्रमुखपदासाठी खासदार श्रीरंग बारणे व आमदार गौतम चाबुकस्वार यांनी योगेश बाबर यांच्या नावाची, तर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुलभा उबाळे यांच्या नावाची शिफारस केली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाबर यांच्या नावाला पसंती दिली आहे

योगेश बाबर हे पिंपरी विधानसभा मतदारसंघ प्रमुख होते. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले, त्यामुळे त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली लक्षणीय मतेही घेतली होती.
बाबर यांना मोठी राजकीय पार्श्‍वभूमी आहे. वडील मधुकर बाबर, चुलते प्रकाश बाबर, चुलती शारदा बाबर यांनी नगरसेवकपद भूषविले असून, दुसरे चुलते गजानन बाबर हे शिवसेनेचे आमदार व खासदार राहिले आहेत.

नियुक्तीने सेनेत अस्वस्थता अनेक जण पक्ष सोडण्याच्या पवित्र्यात
शिवसेनेच्या पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची नियुक्ती झाल्यानंतर शिवसेनेतील वाद उफाळून  आले आहेत. अस्वस्थ गटाने आज एक गुप्त बैठक घेतली. पक्ष सोडण्याची भाषाही बैठकीत केली गेल्याचे  समजते.  शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे पालिका निवडणुकीत निवडून आले व गटनेते झाले.  त्यानंतर त्यांनी आपल्याला शहरप्रमुखपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पक्षाकडे केली. त्यानंतर बर्‍याच काळाने योगेश बाबर यांच्या नियुक्तीची आज घोषणा झाली; मात्र लगेचच सेनेच्या सुमारे 60 पदाधिकार्‍यांची आज दुपारी पिंपरीत तातडीची बैठक झाली. त्यात बाबर यांच्या नियुक्तीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत बाबर यांनी प्रभाग क्र. 10 मधून (संभाजीनगर-शाहूनगर)  पक्षाचे उमेदवार पांडुरंग पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती; मात्र भाजपाच्या तुषार हिंगे यांच्याकडून ते पराभूत झाले. बंडखोरी केल्यामुळे पिंपरी विधानसभा प्रमुखपदावरून त्यांची उचलबांगडी करण्यात आली होती. 

गणेशोत्सवात त्यांच्या राष्ट्रतेज मंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ देखावा सादर केल्याने त्याचीही चर्चा रंगली होती. अशा भाजपाधार्जिण्या व्यक्तीला शहरप्रमुखपद देण्यामुळे शिवसेनेचे मोठे नुकसान होईल, असा इशारा या बैठकीत देण्यात आला. पक्षविरोधी काम करणार्‍या गद्दाराचे नेतृत्व निष्ठावान शिवसैनिकांनी का मान्य करायचे, असा सवाल बैठकीत करण्यात आला.  सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच नेतृत्वात बदल करणे चुकीचे आहे.  बाबर यांच्या नियुक्तीचा फेरविचार करावा;  अन्यथा निष्ठावंत शिवसैनिकांना पक्ष सोडण्याशिवाय पर्याय नसेल, असा इशारा या वेळी देण्यात आला.