Fri, May 24, 2019 02:25होमपेज › Pune › खासगी बसणार्‍यांसाठी 17 नंबर फॉर्मचे यंदा शेवटचे वर्ष

खासगी बसणार्‍यांसाठी 17 नंबर फॉर्मचे यंदा शेवटचे वर्ष

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 12:33AMपुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात येणार्‍या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी 17 नंबरचा फॉर्म भरून खासगीरीत्या प्रविष्ट होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 30 जुलै ते 25 ऑगस्टपर्यंत अर्जदेखील भरता येणार आहेत. 

मात्र 17 नंबर फॉर्मचे हे शेवटचे वर्ष असून, पुढच्या वर्षापासून 17 नंबर फॉर्म भरण्याचा पर्याय बंद होण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. राज्यात दरवर्षी एक ते दोन लाख विद्यार्थी 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देतात. यामध्ये प्रामुख्याने नववीत किंवा अकरावीत नापास झालेले विद्यार्थी आणि काही कारणांनी नियमित शिक्षण घेऊ न शकणार्‍या विद्यार्थ्यांचा समावेश असतो. मात्र, ही मुभा शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून बंद करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू आहे. या विद्यार्थ्यांनाही योग्य मार्गदर्शन मिळावे आणि दहावी-बारावीच्या परीक्षेत मूलभूत विषयांबरोबरच आवडीच्या विषयांचीही निवड करता यावी, या उद्देशाने या विद्यार्थ्यांना ‘मुक्‍त विद्यालय मंडळा’तर्फे परीक्षा द्यावी लागण्याची शक्यता आहे.

खासगीरीत्या प्रविष्ट होणार्‍या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच परीक्षा द्यावी लागत असल्यामुळे नापास होणार्‍यांमध्ये 17 नंबर फॉर्म भरणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असते. या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यात नव्याने सुरू होणार्‍या ‘मुक्‍त विद्यालय मंडळा’तर्फे परीक्षा देण्याची मुभा देण्यात यावी, असा विचार शासनस्तरावर सुरू आहे. जर यावर शिक्‍कामोर्तब झाले, तर फॉर्म 17 भरून परीक्षा देण्यासाठी 2018-19 हे शेवटचे वर्ष असणार आहे. 

केवळ पाचवी, आठवी, दहावी व बारावीची परीक्षा देऊन व त्यासाठी मोजके विषय निवडून पारंपरिक ‘शिक्षणधर्म’ पाळता येणार आहे. आपल्या दोन इयत्तांपुढील शिक्षण घेण्याची बुद्धिमत्ता असणारे अति प्रगत विद्यार्थी, दिव्यांग, कलाकार, खेळाडू अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व ते मुख्य शिक्षण प्रवाहात राहावेत यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मंडळाद्वारे 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून शिक्षण सुरू होणार आहे. या मंडळालाही दहावीचा अभ्यासक्रम हा नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच असावा असाही एक विचार सुरू आहे. यामुळे भविष्यात हा निर्णय झाल्यावर फॉर्म 17 बंद करून परीक्षा देण्याचा मार्ग खुला होऊ शकणार आहे. मात्र, यासंदर्भात सध्या तरी बोर्डातील अधिकार्‍यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.