Thu, Apr 25, 2019 11:45होमपेज › Pune › पुणे : विशेष कार्य अधिकार्‍याची वैद्यकीय अधीक्षकाला धमकी 

पुणे : विशेष कार्य अधिकार्‍याची वैद्यकीय अधीक्षकाला धमकी 

Published On: Dec 09 2017 4:48PM | Last Updated: Dec 09 2017 4:48PM

बुकमार्क करा

पिंपरी  :  प्रतिनिधी

रजा मंजूर केली नाही म्हणून विशेष कार्य आधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षकालाच धमकी दिली. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील विशेष कार्य अधिकारी डॉ. पद्माकर पंडित यांनी शुक्रवारी सकाळी आपल्याला रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रोखून धमकावले अशी तक्रार वायसीएमएच रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांनी केली आहे. पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात डॉ. पंडित यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी द्यावी, त्यांची पालिकेतील सेवा समाप्त करण्याची मागणी  केली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत. याबाबतचे पत्र पत्रकारांच्या हाती लागले आहे.

पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाठविलेल्या पत्रात डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे की,‘शुक्रवारी सकाळी मी रुग्णालयामध्ये प्रवेश करत असताना डॉ. पंडित यांनी मला रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर धमकावण्यात आले. 

‘डॉ. पंडित यांनी यापूर्वी देखील अनेकदा धमकाविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या अशा वर्तनामुळे रुग्णालयामध्ये कामकाज करणे जिकिरीचे होत आहे.  डॉ. पंडित यांचे हे वर्तन घातक असून त्यांच्यावर बंधन घालणे आवश्यक आहे. डॉ. पंडित हे मला अथवा अन्य कोणत्याही अधिकाऱ्यास नुकसान पोहचवू शकतात  असेही म्‍हणण्यात आले आहे. 
नियमाधीन कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी. त्यांची पालिकेतील सेवा समाप्त करण्याची विनंती देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे रुग्णालयातील कामकाज सुरळीत होण्यास मदत होईल. त्याचबरोबर डॉ. पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी देखील डॉ. देशमुख यांनी आयुक्तांकडे केली आहे.

दरम्यान, मी कोणालाही धमकी दिली नाही, असे काहीच घडले नसल्याचे डॉ. पंडित यांनी सांगितले. यावेळी तुम्‍ही सहकार्य करा एवढेच सांगितल्याचेही त्‍यांनी म्‍हटले आहे. 
डॉ. मनोज देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता आपण बाहेरगावी असल्याचे सांगत त्यांनी यावर बोलण्याचे टाळले.