पिंपरी : प्रदीप लोखंडे
पिंपरीतील हिंदुस्थान अॅण्टीबायोटिक्स (एचए) कंपनीतील निवृत्त कामगारांना आपल्याच हक्काच्या रकमेसाठी संघर्ष करावा लागत आहे. 2009 ते 2018 पर्यंत निवृत्त झालेल्या 226 कामगारांना गॅ्रज्युईटी, लिव्ह, एलटीसी आदींसह विविध रक्कम अद्यापही कंपनीने दिली नाही. कामगारांना आपलीच हक्काची रक्कम मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने कामगारांमधूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
‘एचए’ कंपनीतील कामगारांचा थकित वेतनाचा प्रश्न नित्याचाच झाला आहे. सध्या कंपनीत काम करणार्या कामगारांना 12 महिन्यांपेक्षा अधिक काळ वेतन मिळालेले नाही. त्यामुळे आम्ही जगायचे कसे? असा सवाल कामगार कंपनी व्यवस्थापनाला विचारत आहे. याबरोबरच निवृत्त झालेल्या कामगारांनाही आपल्या हक्काच्या रक्कमेसाठी संघर्ष करावा लागत आहे. कंपनीमधील अनेक कामगार 2009 पासून 2018 पर्यंत निवृत्त झाले आहेत. या कामगारांना निवृत्तीनंतर पीएफ, ग्रॅच्युईटी, लिव्ह, एलटीसी (ट्रान्सपोर्ट) आदींसारख्या हक्काची रक्कम मिळते; मात्र ‘एचए’ कंपनीतील या निवृत्त कामगारांना आपल्या हक्काच्या रक्कमेसाठी भांडावे लागत आहे.
2009 ते 2018 पर्यंत निवृत्त झालेल्या 226 कामगारांना हक्काची रक्कम मिळाली नाही. अनेक कामगारांना यासाठी नऊ वर्षे वाट पहावी लागली आहे. तरी अद्याप पीएफची रक्कम वगळता त्यांना इतर कोणतीच रक्कम देण्यात आलेली नाही. याबाबत कामगारांनी वारंवार कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला. तरी त्यांना त्यांची रक्कम मिळालेली नाही. एका कामगाराची प्रत्येकी सुमारे 12 लाख रुपये हक्काचे मिळणार आहेत; मात्र कंपनी तोट्यात आल्यामुळे कामगारांची देणी देण्यात अडचणी येत असल्याचे चित्र आहे. याबाबत या निवृत्त कामगारांनी नुकतीच ‘एचए’ कॉलनीमध्ये बैठक घेतली. या बैठकीमध्ये पुढील लढ्याची दिशा ठरविण्यात आली. कामगारांचा हक्काचा पैसा मिळाला पाहिजे, आदी भावना या बैठकीमध्ये कामगारांनी व्यक्त केल्या. या वेळी सुमारे 70 कामगार उपस्थित होते.
19 मे रोजी पुन्हा बैठक
निवृत्त कामगारांना पीएफची रक्कम वगळता गॅ्रज्युईटी व इतर रक्कम मिळालेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही या रकमेपासून कामगारांना वंचित रहावे लागत आहे. याबाबत नुकतीच बैठक घेण्यात आली. तर पुढील दिशा ठरविण्यासाठी 19 मे रोजी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला सुमारे 226 कामगार उपस्थित राहणार असल्याची माहिती कामगारांनी दिली.