होमपेज › Pune › आयटी अभियंत्याने चाकूने वार करून केला प्रेयसीचा खून

आयटी अभियंत्याने चाकूने केला प्रेयसीचा खून

Published On: Jun 12 2019 8:02AM | Last Updated: Jun 12 2019 10:52AM
पुणे : प्रतिनिधी

प्रेम प्रकरणात धोका दिल्याच्या कारणातून आयटी अभियंत्याने आपल्याच प्रेयसीचा चाकूने वार करून खून केल्याचा प्रकार चंदननगर परिसरात घडला आहे. प्रेयसीचे दुसऱ्या तरूणासोबत संबंध असल्याच्या संशयातून अभियंत्याने हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मीना पटेल ( वय २२, रा. मुळ गोंदींया) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. या प्रकरणी प्रकाश बापू गपाट (वय २४)  यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अभियंता किरण अशोक शिंदे (वय २५, रा.काळेवाडी ) याच्या विरूद्ध चंदननगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नंतर आरोपी हा आपला मोबाईल बंद करून फरार झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मागील एक वर्षापासून तरूणी व आरोपीचे प्रेमसंबध होते. मात्र काही दिवसा पूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यामुळे खून झालेली तरूणी अभियंत्यासोबत बोलत नव्हती. याच कारणातून ती इतर कोणासोबतरी फोनवर बोलत असल्याचा संशय आरोपीला होता. यामुळे शिंदे बेचैन होता. काल रात्री त्याने मीनाला येथील पाण्याच्या टाकी जवळील सिग्नलपाशी  बोलावून घेतले. त्या ठिकाणी देखील दोघांमधे बोलण्यावरुन वाद झाला. याच वादातून शिंदेने मिनावर धारधार शस्त्राने वार केले. यामधे ती गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला कोकडे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र तिचा मृत्यू झाला. 

खून झालेली तरूणी ही मूळची गोंदिया येथील असून नर्सिंगच्या अभ्यासक्रमासाठी ती पुण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेवून आरोपीचा तपास सुरू केला आहे.