Sat, Nov 17, 2018 03:43होमपेज › Pune › पिंपरीत स्वाईन फ्लूने एका महिलेचा मृत्यू

पिंपरीत स्वाईन फ्लूने एका महिलेचा मृत्यू

Published On: Aug 18 2018 6:35PM | Last Updated: Aug 18 2018 6:23PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी- चिंचवड शहरात शनिवारी (दि. १८) स्वाईन फ्लूमुळे एका ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सात नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. १२ जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला असून एक जण व्हेंटिलेटरवर आहेत. २४ संशयितांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. या वर्षी दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर १७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. 

स्वाईन फ्लू संसर्गजन्य आजार आहे. थंडीमध्ये पोषक वातावरण तयार झाल्यामुळे स्वाईन फ्लूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. यंदा स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी होती; मात्र आता त्यामध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. या महिन्यात सुमारे आठ तर यंदा १७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यातील दोघांचा मृत्यू झाला. संशयित रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप केले जाते. आतापर्यंत ३ हजार, ७३२ जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. शनिवारी (दि. १८) १२ जणांच्या तर आतापर्यंत एकूण ९१ जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आले. तर प्रकृती चिंताजनक असल्याने तिघांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. 

या वर्षी स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र वातावरणातील बदलाने स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढतच असल्याचे चित्र आहे. मृत महिलेला १६ ऑगस्टला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. १७ ऑगस्ट रोजी महिलेच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याच दिवशी स्वाईन फ्लू झाल्याचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्‍त झाला. उपचार सुरू असताना संबंधित महिलेचा मृत्यू झाला. वाढत्या स्वाईन फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.