पुणे : प्रतिनिधी
येत्या २४ ते ४८ तासात पुणे, नागपूर, नांदेडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा, दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.
अकोला, नागपूर, चंद्रपूर, वाशीम, नांदेड, परभणी, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, वेंगुर्ला, रत्नागिरी व पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मुंबईसह उत्तर कोकणात शुष्क, दमट, कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
यंदाचा मान्सून २८ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. मान्सून २० मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटावर पोहोचेल. यानंतर तो २४ मे रोजी श्रीलंकेत दाखल होईल आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरावरुन मान्सूनचा प्रवास सुरू होईल, असा स्कायमेटचा अंदाज आहे. मान्सून अपेक्षेपेक्षा चार दिवस आधीच केरळमध्ये दाखल होईल, असा स्काटमेटचा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सून साधारणत: एक जूनला दाखल होतो. मात्र, यंदा तो चार दिवस आधीच केरळमध्ये पोहोचणार आहे.