Fri, May 24, 2019 08:38होमपेज › Pune › चपातीच्या आकार चुकल्याने घटस्फोट? 

चपातीच्या आकार चुकल्याने घटस्फोट? 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

इंजिनिअर असलेल्या पतीच्या घरातील इंजिनिअरिंगला कंटाळून उच्च शिक्षीत पत्नीने न्यायालयात धाव घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे, चपातीचा आकार 20 सेंमी मध्ये हवा, घरातील खर्च पाणी एक्सलसीटमध्ये भरलाच गेला पाहिजे, अन्यथा पत्नीला मार खावा लागल्याचा प्रकार याचिकेच्या माध्यमातून पुढे आला आहे. ऑक्टोबर 2017 पासून पतीपासून ती विभक्त राहत आहे.

पिडीत महिलेच्या वतीने अ‍ॅड. सुप्रिया डांगरे यांनी पिंपरी येथील न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराची याचिका दाखल केली आहे. तर शिवाजीनगर येथील प्रथमवर्ग न्यायालयाकडे घटस्फोटासंदर्भाने याचिका दाखल केली आहे.   

सन २००८ मध्ये प्राध्यापक असलेली पत्नी हिचा विवाह इंजिनिअर असलेल्या  पतीबरोबर झाला. आई वडीलांच्या घरी आनंदात घालविलेले दिवस तेथील स्वातंत्र्य तिला सासरीही मिळेल अशी अपेक्षा होती. लग्नानंतर काही दिवस सुरळीत गेल्यानंतर इंजिनिअर असलेल्या पतीकडून नियमांचा पाढा वाचलाच जाऊ लागला. घरातील कामाबाबत वेगवेगळया अटी घालत त्रास देण्यास सुरुवात केली. दररोजची कामे ठरवून देत त्याने तिला  एक्सेल सीट मध्ये तीन कॉलम करुन पूर्ण, अपूर्ण आणि काय काम झाले अशी कारकुनी करण्यास तिला  भाग पाडून त्यांच्या नोंदी ठेवण्यास सांगितले.  एखादे काम पूर्ण का झाले नाही याचे कारणही  तिला नमूद करावे लागत होते. 

सकाळच्या नाष्ट्याचा मेन्यू आणि तो  मेन्यू  बनविण्यासाठी किती साहित्य लागेल यासाठी तिला पतीचा ग्रिन सिग्नल मिळाल्यानंतर एखादी वस्तू करता येत होती. घरात सामान किती होते, किती लागले, विविध वस्तू किती वापरल्या याचा काटेकोर हिशोब तिला ठेवावा लागत होता. याबाबतची माहिती ही तिला रकान्यामध्ये भरुन पतीला वेळोवेळी द्यावी लागत होती. जर जादा तेल, तांदूळ, डाळ, गहू वापरला गेला तर त्याचा हिशोब तिला द्यावा लागत होता. एखादी वेगळी गोष्ट तिला घरात करायची झाल्यास तिला पतीला ई-मेल पाठवून त्या गोष्टीसाठी संमंती घ्यावी लागत होती. यामध्ये काही चूक झाल्यास पतीकडून तिला मारहाणही केली जात होती.  तो तिच्यावर अमानुषपणे अनैसर्गिक अत्याचारही करत असल्याची बाब याचिकेच्या निमित्ताने पुढे आली आहे. 

 मुलीच्या जिवालाही धोका 

पोटच्या सहा वर्षाच्या मुलीला किरकोळ कारणावरून मारहाण करणे, तिला पाचव्या मजल्यावरुन फेकून देण्याचा प्रयत्न करणे, रागाच्या भरात तिला चाकूचा धाक दाखवत पळवून मारण्याचा प्रयत्न करणे, मुलीस मारहाण करुन घराबाहेर ठेवणे असे प्रकार पती करीत असल्याने तिच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. अशा त्याच्या मनोवृत्तीला कंटाळून अखेर पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराचा तसेच घटस्फोटाचा दावा दाखल केला.  

 

Tags : pune, pune news, Pimpri-Chinchwad news, divorce in pune, reasons of divorce, increase in divorce petition in pune 


  •