Thu, Jul 18, 2019 08:05होमपेज › Pune › महिलेचा खून करून पसार झालेल्या एकाला नक्षली भागातून अटक

महिलेचा खून करून पसार झालेल्या एकाला नक्षली भागातून अटक

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 08 2018 12:09AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी (दि. 1) महिलेचा खून करून मृतदेह पाईपलाईनमध्ये जाळून पसार झालेल्यास वारजे-माळवाडी पोलिसांनी तेलंगणा या नक्षली भागातून अटक केली. तिसर्‍याच व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 

गोपाळ बन्सी राठोड (वय 29, रा. वारजे-माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कविता तारिया राठोड (वय 30, रा. विठ्ठलनगर, वारजे-माळवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. 
कविता राठोड  पतीसोबत वारज्यात राहते; तर आरोपी गोपाळ राठोडही याच परिसरात राहतो. सर्वजण बांधकाम साईडवर कामे करतात. दरम्यान शुक्रवारी (दि. 29 डिसेंबर 2017) कविता नेहमीप्रमाणे कामावर गेली होती; मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही. पतीने तिचा शोध घेतला; परंतु ती मिळून आली नाही. त्यानंतर दुसर्‍या दिवशी (दि. 30 डिसेंबर) पतीने वारजे-माळवाडी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली. वारजे-माळवाडी पोलिस व कविता हिचे नातेवाईक महिलेचा शोध घेत होते.  त्याच वेळी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवारी सकाळी आरएमडी महाविद्यालयाजवळ महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्या वेळी ती कविता राठोड असल्याचे समोर आले. त्यानुसार, वारजे-माळवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. त्या वेळी कविता शुक्रवारी कामावर गेली. दिवसभर कामही केले. त्यानंतर काम संपवून घरी येताना अर्ध्या वाटेतून ती बेपत्ता झाल्याचे समोर आले. तसेच, शेवटचा फोन तिने पतीलाच केल्याचेही निष्पन्न झाले. त्यानुसार, पोलिसांनी कविता राठोडचे नातेवाईक, तेथील कामगार तसेच इतरांकडे चौकशी सुरू केली. त्या वेळी कविता व गोपाळ यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. तसेच, तिने गोपाळकडून काही पैसेही घेतल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी गोपाळचा शोध सुरू केला. त्या वेळी तो   तेलंगणातील जेनत भागात असल्याचे समजले. त्यानुसार, पोलिसांनी त्याला तेथून सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता कविताचे तिसर्‍याच व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्या वादातून रागाच्या भरात खून केला. तसेच, पुरावा नष्ट करण्यासाठी पाईपमध्ये मृतदेह नेऊन जाळल्याचे त्याने  पोलिसांना सांगितले. 

ही कारवाई परिमंडल एकचे उपायुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बाजीराव मोळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश खांडेकर, कर्मचारी संजय दहीभाते, महिला कर्मचारी मॅगी जाधव, नीतीन जगदाळे यांच्या पथकाने केली.