Sun, Aug 25, 2019 01:31होमपेज › Pune › डीपी ठेवत नसल्याने भांडण; पत्नी थेट पोलिसात

डीपी ठेवत नसल्याने भांडण; पत्नी थेट पोलिसात

Published On: May 16 2019 4:16PM | Last Updated: May 16 2019 4:16PM
पुणे : पुढारी ऑनलाईन

मोबाईलमुळे पती-पत्नीतील वादाच्या घटना आता नव्या नाहीत. सतत मोबाईल हातात, व्हॉट्सअॅपवरून वारंवार चॅटिंग असा कारणांमुळे पती-पत्नीत मोठे वाद होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत गेल्याचीही उदाहरणे आहेत. आता पुण्यात एका पत्नीने पतीविरोधात थेट पोलिसांत धाव घेतली. त्याचे कारणही मोबाईलसंबंधितच असून चक्रावून टाकणारे आहे.

त्यांचं झालं असं की, एक महिला पतीसोबत सतत भांडण होत असल्याचे सांगत महिला सहायता कक्षाकडे तक्रार घेऊन आली. त्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी पतीला बोलावून घेतले. पतीने भांडणाचं कारण सांगितल्यावर कुणालाही धक्काच बसेल. पोलिसही चक्रावूनच गेले. 

भांडणाचे कारण सांगताना पतीने व्हॉट्सअॅपला डीपी ठेवत नसल्यामुळे पत्नी सतत भांडण करत असल्याचे सांगितले. याबाबत महिलेकडे चौकशी केली असता, लग्नापासून पतीने एकदाही माझा फोटो डीपी म्हणून ठेवला नसल्याचे सांगितले. या भांडणावरून मात्र पोलिसांची चांगलीच गोची झाली. दोघांनाही समजावून सांगून पोलिसांनी हे प्रकरण मिटवले. पतीनेही पत्नीचा फोटो डीपी म्हणून ठेवणे मान्य केले.