होमपेज › Pune › ...तर धनगर समाज भाजपपासून दुरावेल 

...तर धनगर समाज भाजपपासून दुरावेल 

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 17 2018 1:07AMपिंपरी : प्रतिनिधी 

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पिंपरी-चिंचवड शहर धनगर समाज महासंघाच्या वतीने आरक्षण स्मरण आंदोलन करण्यात आले. मोरवाडी चौक येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. या वेळी त्वरीत आरक्षण न दिल्यास भाजप पासून धनगर समाज दूर जाईल, असा इशारा देण्यात आला. 

धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बारामती येथे तत्कालीन आघाडी सरकारविरोधात समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी उपोषणही करण्यात आले होते.  या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली होती. भाजपची सत्ता आल्यास धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी उपोषण सोडायला लावले. सध्या भाजपची सत्ता असूनदेखील समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करावे लागत आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस हे दिलेले आश्वासन विसरले आहेत. सध्याचे सत्ताधारी आरक्षण देण्यास टाळाटाळ करत आहेत. धनगर समाज संख्येने मोठा आहे. त्यांना कमजोर समजले जात आहे. या समाजातील काही लोकांना सत्तेमध्ये मंत्रीपदे देऊन समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्वरीत समाजाला आरक्षण दिले नाही, तर समाज भाजप पासून दूर जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

पिंपरी-चिंचवड धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष राजू दुर्गे, अशोक खरात, विणा सोनवलकर, उमेश भरखडे, श्रीकांत धनगर, राजेंद्र घोडके, सदाशिव पडळकर, महादेव कवितके, नागेश पितर आदीसह महासंघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.