Fri, Apr 26, 2019 04:02होमपेज › Pune › व्हॉट्सअ‍ॅपवर करा पोलिसांत तक्रार

व्हॉट्सअ‍ॅपवर करा पोलिसांत तक्रार

Published On: Aug 07 2018 1:23AM | Last Updated: Aug 07 2018 1:12AMपुणे : प्रतिनिधी

पुणेकरांना यापुढे पोलिसांच्या 8975283100 या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरच तक्रारी नोंदवता येणार आहेत. या क्रमांकावर पाठवलेल्या अडचणींचीही दखल घेऊन योग्य कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पुण्याचे नवे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी सोमवारी दिली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून शहरातील गुन्हेगारींची माहिती घेतली. 

पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. वेंकटेशम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वाहन चोरीचे प्रमाण जास्त आहे. महागडी वाहने विकत घेतली जातात. मात्र, वाहन चोरीला जाऊ नये म्हणून, हजार-दोन हजार रुपयांचे सेफ्टी लॉक विकत घेतले जात नाही. त्यामुळे वाहन चोरीचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी एका चांगल्या सेफ्टी लॉक शोधून देण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. पुण्यात काम करताना नागपूर पॅटर्नऐवजी नागपूरच्या अनुभवाचा वापर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

शहरात विनापरवाना ढोल-ताशा पथकांकडून सुरू असणार्‍या सरावाबाबत त्यांना विचारला असता ते म्हणाले, यासंदर्भात तक्रार आल्यास अशा पथकांविरोधात निश्चित कारवाई केली जाईल. या वेळी अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह उपस्थित होत्या.

पोलिसांची भीती असावी

गुन्हेगारांच्या मनात पोलिसांची भीती असलीच पाहिजे. सर्व गुन्हे उघडकीस आण्यासाठी पोलिसांकडून शंभर नव्हे, 120 टक्के प्रयत्न केले जातील. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहेत. 

हेल्मेट वापरणे आवश्यक

गेल्या काही दिवसांत शहरात अपघाताच्या चार घटना घडल्या. त्यात चार जणांचा मृत्यू झाला. या तरुणांनी हेल्मेट घातले असते, तर त्यांचे प्राण वाचले असते; त्यामुळे हेल्मेट घातले पाहिजे. 

नागरिकांच्या ‘सीपी पुणे’ या ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले जाईल. वैयक्तिक तक्रारी सोडून, समाजाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या अडचणी व्हॉट्सअ‍ॅप व ट्विटरवर सांगाव्यात. त्याची योग्य दखल घेतली जाईल. शहरातील गुन्हेगारी नियंत्रणावर भर देण्यात येईल. - डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त