होमपेज › Pune › मुळा पात्रास जलपर्णीचा विळखा 

मुळा पात्रास जलपर्णीचा विळखा 

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 12:57AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सीमेवरील दापोडी येथील मुळा नदीपात्रात जलपर्णीचा विळखा कायम आहे. सांगवीच्या मुळा नदी पात्रातही अद्याप जलपर्णीचे अस्तित्व कायम आहे. त्यामुळे दापोडी, सांगवी व बोपोडी परिसरातील रहिवाशांना गेल्या 3 महिन्यांपासून डासांचा प्रादुर्भाव सहन करावा लागत आहे. शहरातून वाहणार्‍या पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचते. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील रहिवशांना डास व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी कायम आहेत. परिणामी, स्थानिक नगरसेवक वैतागले असून त्यांनी आयुक्तांसह संबंधित अधिकारी व क्षेत्रीय अधिकार्‍यांकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.

ठेकेदारामार्फत खूपच संथगतीने जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. तर, काही भागात जलपर्णी काढलीच जात नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. दापोडीतील मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा विळखा कायम आहे. त्यामुळे दापोडी व बोपोडी परिसरातील रहिवाशांना डासांचा त्रास गेल्या 3 महिन्यांपासून सहन करावा लागत आहे. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिक त्यामुळे आजारी पडत आहेत. उकाडा व डासांच्या त्रासामुळे रात्रीची झोपही व्यवस्थित घेता येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. 

सांगवीतील पवना नदीपात्रातील जलपर्णी हटविण्यात आली आहे. मात्र, अद्याप काठावर काही प्रमाणात जलपर्णी कायम आहे. तसेच, मुळा नदीपात्रात ठिकठिकाणी जलपर्णीचा विळखा कायम आहे. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात सांगवीतील नदीकाठच्या परिसरातील वस्त्यांची पाहणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली. तेथील परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित अधिकार्‍यांना तातडीने जलपर्णी काढण्याच्या सूचना दिल्या. मात्र, संथगती कामामुळे जलपर्णी अद्याप आहे तशीच आहे, त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. 

ऑक्टोबरमध्येच जलपर्णीच्या बिया हटवाव्या नदीपात्रात ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास जलपर्णीच्या बिया तयार होतात. छोट्या-छोट्या पानाच्या आकाराची जलपर्णी सर्वत्र पसरू लागते. त्याच वेळी जर या बिया काढून टाकल्या तर, उन्हाळ्यात ती वाढून नदीला जलपर्णीचा विळखा पडणार नाही आणि डासांचा प्रादुर्भाव होणार नाही. तसेच, थेट नदीपात्रात ड्रेनेज, सांडपाणी व औद्योगिक रासायनिक सांडपाणी न सोडल्यास जल प्रदूषण कमी होऊन जलपर्णीची वाढ रोखण्यास मदत होईल, असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. त्यादृष्टीने पालिकेने उपाययोजना करण्याची गरज आहे.