Mon, Aug 19, 2019 18:26होमपेज › Pune › खडकवासला धरणसाखळीत उन्हाळा

खडकवासला धरणसाखळीत उन्हाळा

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 13 2018 1:34AMखडकवासला  : वार्ताहर 

पुणे शहर व परिसरासह जिल्ह्यातील जवळपास एक कोटी नागरिकांना व हजारो हेक्टर शेतीला पाणी पुरवठा करणारया खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ऐन पावसाळ्यात कडकडीत उन्हाळा सुरु आहे. दुसरी कडे धरणसाखळीतील पाणी साठयात वेगाने घट सुरू आहे.  ऑगस्ट अखेर  पिण्यासाठी पुरेल इतका साडे तीन टिएमसी पाणी धरणसाखळीत राखीव ठेवण्यात येणार आहे .असे खडकवासला जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. असे असले तरी पावसाने दिर्घ काळ दडी मारल्यास भीषण पाणी टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ऐन पावसाळ्यातच  त्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार उभी राहणार आहे.

तीन दिवसांनंतर म्हणजे 15 जुन पासून खडकवासला धरणातून सोडण्यात येणारे शेती चे पाणी बंद केले जाणार आहे. तसे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. खडकवासला धरणसाखळीत जवळपास  गेल्या वर्षी इतकाच पाणी साठा उरला आहे. अद्याप तीन दिवस शेतीला पाणी सोडले जाणार असल्याने त्यात पुन्हा मोठी घट होणार आहे. सध्या धरणसाखळीत 3.68 टिएमसी  म्हणजे 12.63 टक्के इतके पाणी आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 12 जुन 2017 रोजी धरणसाखळीत 3.41 टिएमसी  म्हणजे 11.17 टक्के इतके पाणी होते. खडकवासला जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार म्हणाले , खडकवासला धरणसाखळीत पुणे शहर व परिसराला ऑगस्ट अखेर पर्यंत पुरेशा प्रमाणात पुरेल इतका पाणी साठा शिल्लक ठेवला आहे. त्यामुळे पावसाने दडी मारली तरी तुर्त पिण्याच्या पाण्यात कपात करण्यात येणार नाही. पाणी बचतीवर भर देण्यात आला आहे. 15 जून रोजी शेतीचा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. 
खडकवासला धरणसाखळीतील वरसगाव व टेमघर धरणे कोरडी ठणठणीत आहेत.केवळ पानशेत धरणातच पाणी शिल्लक आहे. त्यातही वेगाने घट सुरू आहे. पानशेत धरणात 3.09 टिएमसी म्हणजे अवघे 29 टक्के इतके पाणी आहे.650 क्युसेक्स वेगाने पानशेत मधून खडकवासला धरणात पाणी सोडले जात आहे. त्यानुसार खडकवासला धरणातून पिण्यासाठी तसेच शेतीला पाणी सोडले जात आहे. खडकवासला धरणात 0.59 टिएमसी इतके पाणी आहे. गेल्या आठवड्यात चार धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील  ठराविक भागात वादळी   पाऊस पडला. मात्र धरणाच्या पाणी साठयात कसलीही भर पडली नाही.

 वेधशाळेने  10 व 11 जून रोजी  जोरदार पाऊस पडणार असल्याचा  अंदाज वर्तवला होता. मात्र हा खोटा ठरला आहे. आज मंगळवारी (दि.12) सकाळ पासून सर्व चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कडकडीत उन्हाळा सुरु आहे. गोंडेखल, टेकपोळे, शिरकोली, आंबेगाव, कशेडी, तव, वरसगाव आदी दुर्गम डोंगरी भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडून पुन्हा उन्ह पडत आहे. उन्ह पावसाचा लपंडाव सुरू आहे.  गेल्या 24 तासांत टेमघर येथे 17 मिलीमीटर तर पानशेत येथे फक्त 3 तर वरसगाव येथे 2 मिलीमीटर इतका पाऊस पडला. खडकवासला येथे पावसाचा थेंब ही पडला नाही.