Tue, Apr 23, 2019 21:35होमपेज › Pune › आव्हाळवाडीकरांची पाण्यासाठी वणवण 

आव्हाळवाडीकरांची पाण्यासाठी वणवण 

Published On: Apr 17 2018 1:51AM | Last Updated: Apr 17 2018 12:18AMवाघोली : वार्ताहर  

आव्हाळवाडी (ता. हवेली) येथील पेयजल योजना मंजूर होऊन दोन वर्षापेक्षाही कालावधी लोटला आहे. नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा करूनही मंजूर झालेली पेयजल योजना सुरू झाली नसल्याने आव्हाळवाडीतील  नागरिकांना थेंब थेंब पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे आव्हाळवाडी येथील नागरिकांचा बहुतांश वेळ हा पाण्यासाठी जात आहे. मंजूर झालेली पेयजल योजना लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी ग्रामास्थ करत आहेत.

आव्हाळवाडी गावासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत 3 कोटी 5 लाख गेली काही वर्षांपासून रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत आव्हाळवाडी व परिसरातील विहिरी कोरड्या पडल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण एक ते दीड किलोमीटर भटंकती करून पाणी आणावे लागत आहे. यापूर्वी जिल्हापरिषद पाणीपुरवठा योजनेकडून 2002 मध्ये पाणी पुरवठा केला होता. मात्र दाबनलिका पीव्हीसी असल्यामुळे अनेक ठिकाणी फुटून नागरिकांना पाणी मिळत नव्हते. त्यामुळे स्वतंत्र पाणी पुरवठा करण्याची मागणी ग्रामपंचायतकडून करण्यात आली होती. याची दखल घेत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत योजना मंजूर करण्यात आली. मात्र अनेक वर्षापासून योजना रखडल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तरीही शासन पेयजल योजनेबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असून सर्वत्र पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गावतील व परिसरातील विहारी, कुपनलिका कोरड्या पडल्या असून आव्हाळवाडी, वडजाई, माळवाडी येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. येरवडा, चंदननगर, हडपसर, विमाननगर या ठिकाणांहून पाणी आणावे लागत आहे. पाणी टंचाईचा गुरांना सुद्धा फटका बसला असून दुग्ध व्यावसायिकांना याची झळ पोहोचली आहे. अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. मंजूर झालेली योजना केंव्हा सुरू होणार याकडे आव्हाळवाडीकर आतुरतेने आस लावून बसले आहेत. 

जागाही उपलब्ध : आव्हाळवाडी गावासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत 3 कोटी 5 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी पंचायत समिती सदस्य नारायण आव्हाळे यांनी स्वतःची जागाही उपलब्ध करून दिली आहे. अनेक वर्षापासून ग्रामपंचायत व नागरिकांकडून पाठपुरावा केला जात आहे. दरवर्षी नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तरीही प्रशासन नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाबाबत अत्यंत उदाशी असल्याचे दिसून येते.