Sat, Sep 22, 2018 22:50



होमपेज › Pune › पाणी पुरवठ्यासाठी हंडा मोर्चा काढणार : 'स्थायी'चा इशारा

पाणी पुरवठ्यासाठी हंडा मोर्चा काढणार : 'स्थायी'चा इशारा

Published On: Dec 08 2017 3:47PM | Last Updated: Dec 08 2017 3:46PM

बुकमार्क करा





पिंपरी‬: प्रतिनिधी

आकुर्डी, निगडी, प्राधिकरण परिसरात गेल्या अनेक आठवड्यांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणी नियमित आणि पुरेशा प्रमाणात येत नसल्याने रहिवाशांची गैरसोय होत आहे. या भागातील पाणीपुरवठा येत्या आठवडाभरात सुरळीत करावा; अन्यथा ‘अ’ श्रेत्रीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा स्थायी समितीचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मिसाळ, वैशाली काळभोर व शिवसेनेचे अमित गावडे यांनी प्रशासनाला दिला आहे. 

स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या सभेत आकुर्डी, निगडी व प्राधिकरणातील अनियमित पाणीपुरवठ्यावर चर्चा झाली. त्यानंतर नगरसेवकांनी त्याबाबत माहिती दिली. मिसाळ म्हणाले की, निगडी, प्राधिकरणातील पाणीपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळित झाला आहे. पाणी येण्याची वेळ देखील निश्चित नाही. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. प्राधिकरणात केवळ २० एमएलडी पाणी येत असून, हे पाणी पुरेसे नाही. प्राधिकरणात समान पाणीपुरवठा होत नाही. पवना धरण १०० टक्के भरले असल्याने नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळणे आवश्यक आहे, तरीही पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. हिवाळ्यात पुरेसे पाणी मिळत नाही, तर उन्हाळ्यात काय परिस्थिती येईल, असा सवाल प्रभागातील नागरिकांनी उपस्‍थित केला आहे. 

प्राधिकरणाच्या विविध भागात सकाळी आणि संध्याकाळी पाणी येत नाही; तसेच विविध भागात पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याने रहिवाशांची गैरसोय होत असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक गावडे यांनी दिली.