Wed, Mar 27, 2019 01:57होमपेज › Pune › पाणवनस्पती, जलचर संपले, आता नंबर आपला?

पाणवनस्पती, जलचर संपले, आता नंबर आपला?

Published On: Jun 05 2018 1:28AM | Last Updated: Jun 05 2018 12:27AMपुणे : अपर्णा बडे

जगभरात कौतुक होणार्‍या पुण्याच्या पाण्याला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. पावसाळ्याशिवाय मुठा नदीचे पात्र केवळ सांडपाणी घेऊन वाहू लागल्याने ‘नागदमणी’ सारख्या पाणवनस्पती, माशांच्या  71 प्रजाती नामशेष झाल्या आणि घातक धातूचे प्रमाण वाढले. नदीकाठच्या नागरिकांना सक्तीने प्रदूषित पाणी प्यावे लागत असल्याने, पाण्यामुळे उद्भवणार्‍या आजारांच्या तक्रारी वाढल्या आहेत. आपणच केलेल्या कृत्यामुळे वनस्पती, जलचरांनंतर आता माणसांवरच त्याचा परिणाम दिसून येऊ लागला आहे.

खडकवासला धरणातून पिण्यासाठी पाणी मिळत असल्याने, नदी म्हणून अस्तित्व टिकविण्याकडे डोळेझाक झाली आणि मुठा नदी बघता बघता गटार बनली. मुळात पावसाळ्याखेरीच शुद्ध पाणी पात्रात येत नसल्याने नदीची गरजच नाही म्हणून पात्रात बिनबोभाट सांडपाणी सोडण्यात येत आहे. दररोजचे रसायनयुक्त सांडपाणी, काही प्रमाणात मैलापाणी आणि कचरा तसेच निर्माल्य आणि इतर टाकाऊ वस्तूही पात्रात टाकण्यात येऊ लागल्याने नदीचा श्वास कोंडला आहे. एकेकाळी तळ दिसेल इतके स्फटिकासारखे शुद्ध पाणी आता पिण्यास योग्य नाहीच शिवाय घातक रसायनांमुळे शेतासाठीही नाकारले जाऊ लागले आहे.

25 नाले अन् कचरा थेट पात्रात

सांडपाणी वाहून नेणारे जवळपास 25 नाले थेट नदीपात्रात मिसळत आहेत. त्यामुळे नदीपात्रातील पाणी जैविकदृष्ट्या मृत झाले आहे. त्याचबरोबर शहर आणि नदीपात्रानजीकचे भूजलही प्रदूषित झाले आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या नदीपात्रानजीकच्या गावांमध्ये कचरा उचलण्यासाठी किंवा विघटनासाठी कोणताही प्रकल्प नाही. त्यामुळे तेथील कचरा थेट नदीपात्रात मिसळत असून पात्रात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले आहेत.

महापालिकाच जबाबदार

सांडपाणी रोखून नदीचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी महापालिकेची आहे; मात्र, महापालिकेनेच नाले, गटारींचे पाणी पात्रात सोडल्याने पात्र प्रदूषित झाले. खडकवासला धरणातून पिण्यासाठी पाणी घेताना सांडपाणी शुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून सांडपाणी शुद्ध करून शेतीला देण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे. मात्र, या यंत्रणा कुचकमी ठरल्या आहेत. नदीकाठच्या गावांना पुणेकरांचे सांडपाणी प्यावे लागत असल्याने त्याठिकाणी आजार बळावले आहेत. त्यामुळे महापालिकेला जबाबदार धरुन हरित न्यायाधिकरणाने दंडही केला; मात्र पुणेकरांच्याच खिशातील हे पैसे भरून महापालिकेने जबाबदारी झटकण्याचा कहर केला. 

17  पाणवनस्पती गायब

वनस्पती अभ्यासक विनया घाटे म्हणाल्या, 1980 पर्यंत नदीपात्रात माका, ब्राह्मी, हायड्रीला, क्रिप्टोकोराईन यांसारख्या वनस्पती होत्या. मात्र, आता जलपर्णीमुळे स्थानिक वनस्पतींचे चक्र विस्कळीत झाले. 

सांडपाण्यामुळे वाढली जलपर्णी

जलपर्णी ही मूळची विदेशातील वनस्पती आहे. सांडपाणी आणि कचर्‍यामुळे जलपर्णी फोफवत आहे, असे सांगताना पर्यावरणतज्ज्ञ उपेंद्र धांडे म्हणाले, जाड पाने, गुंतलेल्या मुळ्या, दाटीवाटीने वाढण्याच्या सवयीमुळे जलपार्णी पाण्याचा प्रवाह थोपवून धरते. त्यामुळे नदीत कचरा अडकतो आणि कुजतो. नदीच्या काठावर धोबीघाट आहेत. त्यामुळे नदीत फॉस्फेट आणि नायटे्रट हे घटक मिसळले जातात आणि हे घटक जलपर्णीच्या वाढीस पोषक असतात.  

ऑक्सिजन संपला, मासे मृत

माशांना पाण्यात जिवंत राहण्यासाठी किमान प्रतिलिटर 5 एमजी इतका ऑक्सिजन लागतो; पण मुठेच्या पाण्यात हे प्रमाण केवळ 3 एमजी इतके आहे. त्यामुळे यापूर्वी मूठेच्या पात्रात असणार्‍या सुमारे 71 माशांच्या प्रजाती आता नामशेष झाल्यास असून, केवळ चिलापी हे अत्यंत प्रदूषित पाण्यातही तग धरणारे मासे शिल्लक आहेत.