Mon, Jan 21, 2019 04:42होमपेज › Pune › पाण्याच्या उधळपट्टीला ‘मीटर’चा बसणार चाप

पाण्याच्या उधळपट्टीला ‘मीटर’चा बसणार चाप

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 13 2018 1:22AMपुणे : प्रतिनिधी

पुणेकर पाण्याची उधळपट्टी करतात, असे आरोप नेहमीच होतात; मात्र आता पुणेकर नागरिक नक्की किती पाणी वापरतात याचे मोजमाप होणार आहे. समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरात पाणी मीटर बसविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेंतर्गत तब्बल साडेतीन लाख पाणी मीटर बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात व्यावसायिक मिळकती व त्यानंतर घरगुती मीटर बसविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या समान पाणीपुरवठा योजनेतील सतराशे किमीची जलवाहिनी, पाणी मीटर, केबल डक्ट अशा विविध कामांना स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेत पाणी मीटर हा महत्त्वाचा भाग आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि प्रत्येकाच्या पाणी वापराप्रमाणे त्याला पाण्याचे शुल्क आकारणीसाठी प्रशासनाने आता नळजोडांना पाणी मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. 

समान पाणी योजनेअंतर्गत मीटर लावण्यात येणार आहेत. त्यानुसार तब्बल साडेतीन लाख मीटर संपूर्ण शहरात बसणार आहेत. त्यामधील 40 हजार मीटर हे व्यावसायिक मिळकतींना, तर उर्वरित मीटर हे घरगुती स्वरूपाच्या मिळकतींना बसणार आहेत. 

त्यामध्ये पहिल्या टप्प्यात व्यावसायिक मिळकतींना त्यानंतर पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने घरगुती मीटर लावले जाणार असल्याची माहिती आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. दरम्यान, पालिकेकडून सोसायट्यांना नळजोड दिला जातो. त्यामुळे सोसायट्यांना हे मीटर बसविले जाणार आहेत; मात्र सोसायट्यांनी वैयक्तिक घराप्रमाणे मीटरची मागणी केल्यास त्यांना मीटर दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अत्याधुनिक पाणी मीटर

शहरात यापूर्वी पाणी मीटर बसविण्यात आले होते. मात्र, त्यात छेडछाड केली जात होती, हवेच्या दाबाने या मीटरचे रीडिंग पडायचे; मात्र आता जे पाणी मीटर बसविण्यात येणार आहेत, ते अत्याधुनिक पध्दतीचे आहेत. कन्ट्रोल रूममधून या मीटरचे रीडिंग घेता येणार आहे. त्याचबरोबर तो बंद पडल्यास अथवा त्यात छेडछाड करण्याचा प्रकार झाल्यास, कंट्रोल रूमला तत्काळ त्याची सूचना मिळू शकणार आहे.