पिंपरी : प्रतिनिधी
महापालिकेच्या कारभारावर प्रशासनाचा वचक नाही, हे वारंवार सिद्ध होत आहे. सुटीच्या काळात पालिका आवारात चक्क वॉशिंग सेंटर सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. पालिकेत स्वच्छता करणार्या बी.व्ही.जी.च्या सफाई कामगारांकडून कर्मचार्यांची खासगी वाहने धुवून घेत आल्याचे निदर्शनास आले आहे.
दुसर्या शनिवारी (दि.11) पालिकेला सुटी होती. बी.व्ही.जी.चे स्वच्छता कर्मचारी महापौर निवडीनंतर उधळण्यात आलेला भंडारा साफ करण्याचे काम करत होते; परंतु दुपारनंतर त्यांनी तेे काम बंद करून पालिकेत कामावर असणार्या कर्मचार्यांच्या दुचाकी वाहने धुण्याचे काम सुरू केल्याचे निदर्शनास आले. एकवेळ पालिकेची वाहने धुतली तरी चालू शकते; मात्र कर्मचार्यांची वाहने बिनधास्तपणे धुवून घेतली जात होती. सुट्टीच्या काळात सफाई कर्मचारी जणू पालिकेतील कर्मचार्यांच्या दिमतीलाच हजर होता, अशी परिस्थिती दिसून आली.
विकासकामे नियमातच केली जातात, असे सत्ताधारी भाजपकडून मिरवले जाते. मग स्वछता कर्मचारी हे त्या कामगारांच्या दुचाकी धुण्यासाठी नेमले आहेत का, असा सवाल येथे उपस्थित होत आहे. सुरक्षारक्षकही सुटीतील वॉशिंग सेंटर बाबत मूग गिळून गप्प होते. याबाबत सत्ताधारी काय निर्णय घेणार, याकडे पालिकावर्तुळात लक्ष आहे.