Sat, Jan 19, 2019 11:39होमपेज › Pune › ६५ वर्षाच्या वारकरी आजीची शिक्षणाची जिदद, मातीत आकडे काढून शिकले

६५ वर्षाच्या वारकरी आजीची शिक्षणाची जिदद, मातीत आकडे काढून शिकले

Published On: Jul 08 2018 9:43PM | Last Updated: Jul 08 2018 9:43PM पुणे : प्रतिनिधी

 ‘माझं साळातल शिक्षण झालेलं नाही. पण, म्या पौ्रढ शिक्षण घेतल आणि त्याबरोबर गावातील इतर दीडशेपेक्षा अधिक बायांनाही साक्षर बनवलय. पाटीवर लेन्ह करण्यासाठी येळ नसायचा म्हणून म्या शेतात काळया आईच्या पोटावर रेघा ओढून बाराखडी शिकली आणि आज मी सर्व ग्रंथांचे पारायण करते आणि भजनाद्वारे महिलांचे प्रबोधन करते, हे शब्द आहेत जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यातील चांदाई गावात राहणा-या सौ. कांताबाई भगवान पडूळ या ६५ वर्षीय वारकरी आजीचे. 

घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता न आल्याचे कारणे अनेकजण सांगत नशीबाला दोष देतात. पण, मनात जिदद आणि प्रचंड इच्छाशक्ती असेल तर ती व्यक्ती काहीही करू शकते त्यांच्यासाठी कांताबाई आदर्श ठरल्या आहेत. त्या गावातील महिलांसोबत माउलीच्या दिंडीत सहभागी झाल्या आहेत. यंदाचे त्यांचे हे पंचवीसावे वर्ष आहे. पण  त्यांची जिदद आणि चिकाटी आजच्या महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. कांताबाई  यांचे कोणतेही शालेय शिक्षण झालेले नाही. पण, लग्नानंतर त्यांनी प्रौढ शिक्षण घेउन त्या इतक्या पुढे गेल्या आहेत की त्यांनी ज्ञानेश्‍वरी, गाथा, भागवत पारायण केले आहेत. आज त्या खड खड सर्व अभंग वाचून दाखवतात.

त्याचबरोबर त्या सामाजिक कार्यातही हिरीरिने सहभाग घेतात. गावात भजन, भजनाद्वारे प्रबोधन, पल्स पोलिओ मोहिमेत सहभाग, स्वावलंबी होण्याबाबत महिला जागृती, हुंडाबळी प्रथा याबाबत त्या भजनातून सामाजिक संदेश देतात. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना २००१ -०२ मध्ये ‘अहिल्या होळकर पुरस्कार, व इतर पुरस्कार मिळाले आहेत. कांताबाई यांचा एक मुलगा देशसेवेत सैनिक आहे तर दुसरा औरांगाबाद येथे खरेदी विक्रीचे व्यावसाय करतो. 

 मुलगी दत्तक घेणार

कांताबाई यांना मुलगी नाही. त्यामुळे त्यांना मुलगी दत्तक घ्यायची इच्छा आहे. या वयातही त्या तिला शिक्षण देउन तिच्या पायावर उभी करण्याची जिदद बाळगतात. आणि सर्वात शेवटी कांताबाई या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची चुलत बहिण असल्याचेही सांगतात.