Sat, Jul 04, 2020 14:24होमपेज › Pune › यंदा आषाढी वारी पायी नाही; पण, माऊलींच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार (video)

यंदा आषाढी वारी पायी नाही; पण, माऊलींच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार (video)

Last Updated: May 30 2020 2:04AM

file photoपुणे : प्रतिनिधी

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाचा संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा पादुका घेऊन कमी लोकांमध्ये वाहन, विमान किंवा हेलिकॉप्टर या तीन पर्याय पैकी त्यावेळीच परिस्थिती पाहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. असा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. अशी माहिती आळंदी देवस्थान प्रमुख विकास ढगे आणि देहू देवस्थान प्रमुख अभय टिळक यांनी दिली.

वाचा : आषाढी यात्रेला जिल्हा पोलिसांचा रेड सिग्‍नल 

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये आज पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक पार पडली.

पालखी सोहोळा ठरल्याप्रमाणे मंदिरातून निघेल. पण दोन्ही पालख्या मंदिरात दक्षमीपर्यंत राहतील. त्यानंतर पादुका घेऊन मार्गस्थ होण्यासाठी आजच्या बैठकीत बस, हेलिकॅप्टर किंवा विशेष विमान हे तीन पर्याय दिले आहेत. त्यापैकी एका पर्यायाची निवड त्या वेळच्या परिस्थितीनुसार केली जाणार आहे.

आळंदी आणि देहुच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहेत. पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने नेण्याबाबत नंतर ठरवले जाईल. देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झाले आहे.

आषाढी वारी कशी पार पाडायची आणि आळंदी आणि देहूहून पादुका पंढरपूरला कशा न्यायच्या याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी,  देहू आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भुमिका मांडल्या. 

वाचा : आषाढी वारीतून रेल्वेला सात लाखांचा तोटा

यावेळी वारकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भुमिका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकूण घेतल्या.  त्यानंतर आळंदी आणि देहूवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात, अशी भुमिका  मांडण्यात आली.

इतिहासात यापूर्वी दोनवेळा आषाढी वारी रद्द झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये १९२० चे दशक आणि १९४५ ला रद्द झाली होती. यावर्षी पायी पालखी सोहळा रद्द झाला असला तरी ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका विमान, हेलिकॉप्टर किंवा बसचा पर्याय निश्चित करण्यात आले आहे, असे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे विश्वस्त ॲड. अभय टिळक यांनी सांगितले.

कोट्यावधी वैष्णवांचे श्रध्दास्थान आणि ७०० वर्षांची परंपरा असलेली पंढरीची आषाढी वारी कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आली आहे.  श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरली जाऊ नये, अशी भूमिका पोलिस प्रशासनाने घेतली आहे.