Mon, Aug 19, 2019 16:17होमपेज › Pune › पुण्यात मतदानाला शांततेत सुरूवात

पुण्यात मतदानाला शांततेत सुरूवात

Published On: Apr 23 2019 8:09AM | Last Updated: Apr 23 2019 9:34AM
पुणे : प्रतिनिधी

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या पुणे व बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी आज, मंगळवारी (ता. 23) सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील 4369 केंद्रांवर मतदान होत आहे.  

पुण्यात 31 उमेदवार रिंगणात आहेत. तर पालकमंत्री गिरीश बापट आणि मोहन जोशी यांच्यामध्ये थेट लढत होत आहे.

केवळ महिला कर्मचारी असलेले सखी मतदान केंद्र आणि केवळ दिव्यांग कर्मचारी असलेले स्वावलंबी मतदान केंद्र हे वेगळे वैशिष्ट्य आहे. मतदान प्रक्रीयेसाठी साडेनऊ हजारांवर कर्मचारी आणि तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पुण्यातील एका मिसळ व्यावसायिकाने नामी शक्कल लढवली आहे. जे कोणी मतदान करुन येईल त्यांना एका मिसळवर एक मिसळ फ्री देण्यात येणार आहे. 

मतदान प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रुम तयार केली असून जिल्हाधिकारी नवलकिशोर राम या रुममधून प्रक्रीयेवर लक्ष ठेवून आहेत.
लोकसभा निवडणुकांकरिता मतदान केंद्रांवर अत्यावश्‍यक किमान सुविधांची संख्या यावर्षी दुप्पट करण्यात आली आहे. यामध्ये मेडिकल किट, मतदान केंद्रांवर सावलीची व्यवस्था, दिव्यांग तसेच गर्भवती महिला मतदारांसाठी स्वयंसेवकांची मदत, लहान मुलांसाठी पाळणाघर, अंध आणि दिव्यांग मतदारांच्या वाहतुकीची व्यवस्था, रांगेचे व्यवस्थापन या सुविधा यावर्षी नव्याने करण्यात आल्या आहेत. 

गेल्या निवडणुकीत मतदान केंद्रांवर सुमारे सात प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. नव्याने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधेतील मेडिकल किटमध्ये वेदनाशामक औषध, बॅण्डेज, ओआरएस पावडर, जखमेवर लावण्यासाठी पट्टी आदी साहित्याबरोबरच प्रत्येक मतदान केंद्रावर एक वैद्यकीय सहाय्यक उपलब्ध.आहे. वाढत्या तापमानाची दखल घेताना मतदान केंद्रांवर महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि महिलांसोबत असलेल्या लहान मुलांचा उन्हापासून बचावाकरिता, सावलीसाठी मंडप टाकण्यात आले आहेत.

मतदानाचा हक्क मी प्रथमच बजावला असून मला याचा अभिमान आहे. सर्वांनी मतदान केले पाहिजे.
- ईशा चंद्रशेखर ठाकूर-देसाई, बारामती लोकसभा मतदार संघ, आंबेगाव बु., जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मतदान केंद्र.

कर्तव्य पार पाडत असताना मतदान करणे कीती महत्वाचे, असा संदेश शहर गुण्हे शाखा २ चे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी वर्दीवर असताना मतदान केले

भाजप उमेदवार गिरीष बापट मतदानाचा हक्क बजवाण्यासाठी सहकुटूंबासहित बुथ वर उपस्थित

खासदार अनिल शिरोळे यांनी जंगली महाराज रस्त्यावरील दी आंध्र हायस्कूल येथे सकाळी ठिक 9.15  वाजता सपत्नीक मतदान केले.