Tue, Jul 23, 2019 01:55होमपेज › Pune › एकबोटेला अटक करायची आहे पण... : नांगरे पाटील

एकबोटेला अटक करायची आहे पण... : नांगरे पाटील

Published On: Feb 21 2018 4:59PM | Last Updated: Feb 22 2018 12:38AMदेहूरोड : वार्ताहर

मिलिंद एकबोटे याला केवळ अटक व्हावी आणि लगेच सुटका होऊ नये, तर त्याच्या अटकेनंतर पोलिसांना चौकशीसाठी ( कस्टोडियल इन्टरोगेशन) पुरेसा वेळ मिळावा, अशी पोलिसांची भूमिका असल्याचे कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी देहूरोड येथे पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. 

एकबोटेला अद्याप अटक का झाली नाही, असे खडे बोल सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सुनावले होते. या पार्श्‍वभूमीवर नांगरे पाटील यांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता त्यांनी उत्तर दिले. देहूरोड उपविभागातील पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील स्टार हंड्रेड हे नागरिकांचे पथक तयार करण्यात आले आहे. सध्या पुणे ग्रामीणच्या तपासणी दौर्‍यावर असलेले नांगरे पाटील यांनी या स्टार हंड्रेड कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी ग्रामीणच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते,  उपविभागीय पोलिस अधिकारी गणतराव माडगूळकर, पोलिस निरीक्षक अरुण मोरे, राजेंद्र निंबाळकर, मुुकुट पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी अनेक गंभीर विषयांवर नांगरे पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास सीबीआय, एसआयटी आणि स्थानिक पोलिसांमार्फत समांतर सुरू आहे.  मुख्य तपास सीबीआयकडे असला तरी पोलिसांकडून आवश्यक सहकार्य केले जात आहे. कर्नाटकातील सीमावर्ती भागातील पाच जिल्हे आणि त्यांना लागून असलेले महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक झाली.  त्यात संबंधित खून प्रकरणातील आरोपींच्या तपासाकरता सहकार्य करण्याचे संमत झाले आहे.

तपास आता अंतिम टप्प्यात असून दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. मात्र, ते बराच काळ फरार आहेत. त्यांना लवकरच फरार घोषित करण्यात येणार असल्याची शक्यता पाटील यांनी वर्तविली.  यावेळी पोलिसांचे विविध विभाग व त्यांचे कार्य, नव्याने सुरू केलेले उपक्रम, अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी व नशेपासून परावृत्त करण्यासाठी 22 हजार मुलांसाठी पोलिसांच्या वतीने राबविण्यात आलेला उपक्रम; तसेच मुलींच्या व महिलांच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी दामिनी पथक, साध्या वेशात महिला पोलिसांनी फिरून रोडरोमिओंच्या मुसक्या आवळण्याचे प्रकार आदींबाबत माहिती देण्यात आली. या वेळी मुळशी, तळेगाव, देहूरोड तळेगाव एमआयडीसी आदी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून आलेले स्वयंसेवक,  महिला दक्षता समिती सदस्यांनी विविध समस्या मांडल्या.

वाचा इतर बातम्या 
हनीमूनचा अनुभव विद्यार्थिनींना सांगणे पडले महागात
माजी पंतप्रधानांच्या पत्नीने पेन्शनमधून फेडले होते PNB चे कर्ज