Wed, Jan 23, 2019 02:43होमपेज › Pune › चोरीची क्लिप व्हायरल झाल्याने आत्महत्या

चोरीची क्लिप व्हायरल झाल्याने आत्महत्या

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 1:54AMराजगुरुनगर : प्रतिनिधी

किराणा दुकानातील चॉकलेटची बरणी चोरी करतानाचा व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने विठ्ठल विष्णू बारणे (43, रा. दोंदे, ता. खेड) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.  पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मयत बारणे यांनी रविवारी (दि. 4) वडगाव (ता. खेड) येथील नवनाथ किराणा प्रोव्हीजन स्टोअर्स या दुकानात जाऊन गाय छाप विकत घेण्याच्या निमित्ताने गेल्यावर दुकानदाराची नजर चुकवून काऊंटरवरील चॉकलेटची बरणी चोरून नेली. हा प्रकार दुकानातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरामध्ये कैद झाला. 

या प्रकरणाची वाच्यता होऊ नये म्हणून दुसर्‍या दिवशी विठ्ठल बारणे यांचे भाऊ संतोष बारणे यांनी संबंधित दुकानात जाऊन दुकान मालक यांच्याशी चर्चा करून चोरी केलेल्या चॉकलेट बरणीचे पैसे देऊन प्रकरण मिटवून टाकले होते. मात्र, सोमवारी (दि. 5) दोंदे गावचे माजी सरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत संभाजी बारणे यांनी सी.सीटिव्हीवरील क्लीप मोबाईलद्वारे व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल केले. या व्हिडिओत विठ्ठल बारणे यांचा चेहरा व चॉकलेटची बरणी चोरून नेत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते.

विठ्ठल बारणे यांची गावात  बदनामी झाली व त्याचा धसका घेऊन विठ्ठल बारणे यांनी (दि. 5) रात्रीच्या वेळी गावातील दशक्रिया घाटातील शेडच्या लोखंडी अँगलला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी त्याचा भाऊ संतोष बारणे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.