Sun, Jan 19, 2020 16:04होमपेज › Pune › व्हर्चुअल गुरुंमुळे अंध-मुकबधिरांना मिळाली नवी दृष्टी! (video)

व्हर्चुअल गुरुंमुळे अंध-मुकबधिरांना मिळाली नवी दृष्टी! (video)

Published On: Jul 16 2019 7:50PM | Last Updated: Jul 17 2019 12:23PM
पुणे : प्रतिनिधी 

टेक्नॉलॉजीमुळे जीवन सुसह्य होत असताना हीच टेक्नॉलॉजी कुणासाठी तरी मार्गदर्शक गुरु बनत आहे. आपण आपल्या आजूबाजूला अनेकदा अंध, मूकबधिर लोक पाहत असतो आणि त्यांचे आयुष्य कशा प्रकारे जगतात या बाबत एक कुतूहल मनात नक्कीच असते. अशाच विशेष लोकांना सध्या बदलते तंत्रज्ञान एक व्हर्चुअल गुरूच ठरत आहे. 

स्मार्टफोन कामासाठी कमी आणि मनोरंजनासाठी अधिक वापराला जातो. पण हाच स्मार्टफोन अंध आणि मूकबधिर नागरिकांसाठी एक वरदानच आहे. त्यांचे परावलंबित्व आता कमी झाले आहे. हा स्मार्टफोन त्यांच्यासाठी एक मार्गदर्शक, गुरु मित्र आदी भूमिका निभावत आहे. 

याबाबत मिहीर गोखले सांगतो, की मी मूकबधिर आहे आणि माझ्या सारख्या मुलांना इशार्‍याच्या भाषेद्वारे संभाषण करावे लागते. त्याला आधी काही मर्यादा येत असे. जसे की संभाषणासाठी दोन्ही व्यक्ती प्रत्यक्ष समोरा समोर उपस्थित असणे गरजेचे असते. परंतु, आता व्हिडिओ कॉलमुळे आमच्यातील अंतर आता कमी झाले आहे. तसेच व्हॉट्सअप फेसबुकमुळे आम्ही एकत्र येत आहोत. आमच्यातील संवाद आता हातातील मोबाइलमुळे सुकर झाला आहे. 

पूर्णपणे अंध असलेले दौलत शेख आणि विशाल रोकडे यांनी तर व्हर्चुअल गुरूचे मार्गदर्शनामुळे त्यांना नवी दृष्टीच प्राप्त झाल्याचे सांगितले. हातातील स्मार्ट फोन हा त्यांना विविध अपद्वारे मदत करत असतो. असिस्टीव्ह टेक्नोलॉजीमुळे क्रांतिकारक परिवर्तन घडत आहे. ब्लाइंड स्क्वेअर सारख्या  ॲपद्वारे रस्ता समजण्यास मदत होते. टॉक बॅकमुळे स्मार्ट फोनची स्क्रीन त्यांना ऐकता येते. इतकेच नव्हे तर व्हर्चुअल असिस्टन्समुळे त्यांना फोटो काढता येतो तसेच फोटोचे वर्णन देखील त्यांना सहजपणे व्हर्चुअल असिस्टन्स ऐकवतो.

 

आपल्याला वाटेल की या स्पर्धेच्या युगात ही मुले मागे पडत असतील. पण खरे तर ही मुले या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरीसाठीच्या स्पर्धा परीक्षा अतिशय उत्तम गुणांनी उत्तीर्ण होताना दिसत आहे. फेसबुक, व्हॉट्सअप, युट्युबचा वापर अतिशय सहजपणे ही मुले करताना दिसत आहे. 

एनएडब्लुपीसी ही संस्था अंध आणि अपंग मुलांसाठी काम करते या संस्थेचे संस्थापक राहुल देशमुख मुलांच्या टेक्नॉलॉजीच्या वापरा बद्दल म्हणतात, "त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आहे. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे.  व्हर्चुअल असिस्टंन्समुळे व्यक्तिगत आयुष्यात अंध व्यक्तींना स्वावलंबी बनले आहे. त्यामुळे करिअरमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होतोय. असिस्टीव्ह टेक्नोलॉजी ही अंध व्यक्तींना सामान्याच्या बरोबर ठेवण्याचे महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे."