होमपेज › Pune › व्हॉट्सअप डीपीवरुन तरुणीचा बनवला अश्‍लील व्हिडीओ  

व्हॉट्सअप डीपीवरुन बनवला अश्लील व्हिडिओ

Published On: Jul 18 2018 8:10AM | Last Updated: Jul 18 2018 8:21AMपुणे : प्रतिनिधी

महिलेचा मोबाईल क्रमांक मिळवून व्हॉट्सअपला ठेवलेले प्रोफाईलचे फोटो अपलोड करत फोटो शॉपीच्या माध्यमातूनअश्‍लील व्हिडीओ तयार केला. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार करणार्‍याला महिलेच्या नातेवाईकांनी सारसबागेत भेटण्यास बोलावले. या ठिकाणी आल्यावर त्याला पकडून चोप दिला. तसेच, पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी विनयभंगासह आयटी अ‍ॅक्टसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिनेशकुमार मोहनलालजी सुथार (वय 31, रा. सीताराम निवास, तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेशकुमार याच्या नात्यातील तरुणीची आणि फिर्यादी यांची ओळख आहे. त्यामुळे आरोपी दिनेशकुमार हा फिर्यादींना ओळखत होता. त्याचे फिर्यादींवर एकतर्फी प्रेम होते. त्यातूनच त्याने फिर्यादींचा मोबाईल क्रमांक मिळवला. तसेच, त्यांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर असणारे प्रोफाईल फोटो डाऊनलोड करून घेतले. त्यानंतर फोटोशॉपीच्या माध्यमातून अश्‍लील व्हिडीओ आणि फोटो तयार केला. तसेच, फिर्यादींना फोन करून भेटण्यासाठी बोलावले. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्याने हे फोटो आणि व्हिडीओ फिर्यादींच्या मोबाईलवर पाठविले. तसेच, भेटायला न आल्यास हे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व युट्युबवर टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादींनी त्यांचे पती व नातेवाईकांना हा सर्व प्रकार सांगितला. नातेवाईकांनी त्याला सारसबागेत भेटण्यासाठी बोलविण्यास सांगितले. त्यानुसार, त्याला सारसबागेत भेटण्यास बोलविले. तो सोमवारी सारसबागेत आला व फिर्यादींना बोलण्यास जवळ येताच नातेवाईकांना त्याला पकडले. त्याला चोप देऊन सहकारनगर पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.