Wed, May 22, 2019 10:14होमपेज › Pune › सीएनजीचा वापर वाढतोय...पंप वाढवा

सीएनजीचा वापर वाढतोय...पंप वाढवा

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 15 2018 1:06AMपुणे : नरेंद्र साठे

सद्यःस्थितीत शहरामध्ये पावणे दोन लाखापेक्षा अधिक वाहने सीएनजीवर चालत असून, या वाहनांना इंधनचा पुरवठा करणार्‍या पंपाची संख्या केवळ 52 आहे. त्यामुळे सीएनजी वाहनचालकांची अडचण होत असून, पंपांची संख्या वाढवण्याची गरज असल्याची मागणी रिक्षा चालकांकडून केली जात आहे.

पावणे दोन लाख वाहने सीएनजीवर

पेट्रोलला पर्यायी इंधन म्हणून सीएनजीकडे पाहिले जाते. सीएनजीचा वापर वाढावा यासाठी मनपाकडून रिक्षा चालकांना अनुदानही दिले जाते. पुण्यात सीएनजी धावणार्‍या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सीएनजीवरील पावणे दोन लाख वाहने धावत आहेत. परंतु त्या तुलनेत सीएनजी पंप अपुरे पडत आहेत. पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक वाहन चालक सीएनजीकडे वळले आहेत. मात्र, त्यांना अनेकवेळा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

पुण्यामध्ये दररोज 52 सीएनजी पंपाद्वारे सुमारे 3 लाख 64 हजार किलो गॅसचा पुरवठा केला जातो. सीएनजीचा सर्वात मोठा ग्राहक हा रिक्षा चालक आहेत. शहरातील 5 हजार 305 या रिक्षा सीएनजीवर धावत आहेत. शिवाजीनगर सीएनजी पंपावर गॅसभरण्यासाठी उभे असलेले रिक्षा चालक प्रमोद शिंदे म्हणाले, दिड ते दोन तास रांगेत थांबावे लागते. सकाळी लवकर आले, तर लवकर नंबर लागतो. परंतु सर्वांनाच व्यवसाय करण्याची घाई असल्याने रिक्षा चालक सकाळी लवकरच येऊन रिक्षा नंबरला उभ्या करतात. एकादा टाकी पुर्ण भरल्यानंतर साधारण दोन दिवस जाते. सीएनजीवर रिक्षा चालवणे परवडते परंतु गॅस भरण्यासाठी जास्त वेळ जातो. मध्यवर्ती शहरात देखील सीएनजी पंपाची आवश्यकता आहे. 

सिंहगड रोड, पुणे स्टेशन सीएनजी पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मी कॅब चालवताना अनेकवेळा या दोन ठिकाणी गॅस भरतो. बर्‍याचदा गॅस भरण्यासाठी वाट पाहवी लागते. कोथरूडमध्ये खूप चांगली सेवा दिली जाते, त्यामुळे कॅब चालक त्या बाजूला गेल्यानंतर कोथरूडच्या एमएनजीएलच्या पंपावर गॅस भरतात. शहराच्या सोबतच आजूबाजूच्या मुख्य रस्त्यांवर सीएनजी पंप असणे आवश्यक असल्याचे अजित देसाई या कॅब चालकाने सांगितले.  पुणे शहरातील नव्या रिक्षांना मार्च 2010 पासून सीएनजीची सक्ती लागू करण्यात आली आहे. सर्वाधिक सुमारे 50 हजार रिक्षांना सीएनजी किट बसविण्यात आले आहेत. याशिवाय पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) सुमारे 653 बसही सीएनजीवर चालतात. पीएमपीएलला काही पंप राखीव ठेवण्यात आले आहेत. मात्र, बाकीच्या कार, कॅब यांच्यासाठी गॅस पुरवठा सुरळीत महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून (एमएनजीएल) शहराबरोबरच आजुबाजूच्या परिसरात सीएनजी पंपांची उभारणी होणे आवश्यक आहे.