Thu, Apr 25, 2019 16:24होमपेज › Pune › पुण्यात उद्यापासून बेमुदत चक्री उपोषण

पुण्यात उद्यापासून बेमुदत चक्री उपोषण

Published On: Aug 19 2018 1:29AM | Last Updated: Aug 19 2018 1:09AMपुणे : प्रतिनिधी
मराठा समाजास आरक्षण मिळावे, आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई, त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी; तसेच आंदोलकांवरील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशा विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (20 ऑगस्ट) पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य समन्वयक शांताराम कुंजीर, तुषार काकडे, बाळासाहेब आमराळे, रेखा कोंडे आणि सचिन आडेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

औरंगाबाद येथे मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजाच्या समन्वयकांच्या 8 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत आंदोलनाबाबतची दिशा ठरविण्यात आली होती. त्याप्रमाणे 20 ऑगस्टपासून दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषण करण्यात येणार आहे. 

आंदोलनात सहभागी होणार्‍यांसाठी खास आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. 

9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या ठिय्या आंदोलनात कार्यालयाच्या प्रवेशव्दाराचे झालेले नुकसान भरुन देण्यात आलेले आहे. मात्र, पुण्यात आंदोलनानंतरही बसून राहिलेल्या आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. ते सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी काकडे यांनी यावेळी केली.

समितीची औरंगाबादेत लवकरच बैठक 

चक्री उपोषण आंदोलनात सहभागी होणार्‍यांसाठी आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. आंदोलन शांततेने, संयमाने व शिस्तीने करावे, गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करू नये, प्रक्षोभक व भडकावू घोषणा-भाषणे करू नये, आंदोलनादरम्यान झालेला कचरा, रिकाम्या बाटल्या कचरा पेटीत टाकाव्यात, अनुचित प्रकार करणार्‍यांना रोखून पोलिसांच्या ताब्यात द्या, अशी वर्तणूक ठेवून कार्यकर्त्यांनी बेमुदत चक्री उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहन मोर्चाच्या समन्वयकांनी केले. मोर्चाच्या राज्य समन्वय समितीची औरंगाबादेत लवकरच बैठक होणार असून त्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरेल, असेही सांगण्यात आले. 

... त्या सहा वर्षाच्या मुलीची भेट घेणार

चांदणी चौक, कोथरुड येथे 9 ऑगस्टच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांमध्ये काही नागरिक जखमी झाले आहेत. त्यामध्ये सहा वर्षाच्या मुलीचाही समावेश असून सध्या ती खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने तिच्या आजाराची चौकशी करण्यात येणार असल्याचे तुषार काकडे यांनी सांगितले.

दंगलीमागचा सूत्रधार शोधा 

मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजातर्फे गेली दोन वर्षे शांततेच्या मार्गाने व अहिंसक पद्धतीने आंदोलन केले जात आहे. हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे गेल्या काही महिन्यांपासून घडलेल्या घटना व घडामोडींवरून समोर आले आहे. या आंदोलनात बाह्य शक्तींचा हात असल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा सूत्रधार कोण आहे, याचा पोलिसांनी व राज्य शासनाने शोघ घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अशी मागणी समन्वयकांनी यावेळी केली.