Fri, Jul 19, 2019 05:06होमपेज › Pune › वायसीएम रुग्णालयात आढळला बेवारस मृतदेह

वायसीएम रुग्णालयात आढळला बेवारस मृतदेह

Published On: May 05 2018 10:58AM | Last Updated: May 05 2018 10:58AMपिंपरीः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम ) रुग्णालयाच्या तातडीच्या वैद्यकीय विभागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरूणाचा मृतदेह आढळला असून तीन दिवसांनतरही त्याच्या विषयी कोणतीच माहिती रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांना मिळालेली नाही. 

वायसीएम हॉस्पिटमध्ये बुधवारी (२ मे) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. एका रुग्णाला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी रात्री साडे सातच्या सुमारास आंतररूग्ण विभागात दाखल केले. त्यामुळे या ठिकाणचा बेड रिकामा झाला. त्यानंतर त्याठिकाणी दुसरा एक व्यक्ती येऊन झोपला. मात्र, तो एक रूग्ण येऊन झोपला असावा असा समज उपस्थित डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय, सुरक्षारक्षक यांचा झाला. काही वेळाने डॉक्टरांनी (सीएमओ) तातडीच्या वैद्यकीय विभागात बेडवरील त्या तरूणाबाबत विचारणा केली. पण कोणालाच याची काहीच माहिती देता आली नाही. तत्काळ डॉक्टरांनी तरूणाला तपासले असता, त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.

या तरूणाबरोबर कोणी नातेवाईक, मित्र आहेत का याचा शोधाशोध घेतल्यावर या तरूणाबरोबर कोणीच नसल्याचे समजले. हा तरूण स्वतः उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये आला का, त्याचा हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच मृत्यू झाला होता का, त्याला येथे कोणी आणून सोडून निघून गेले का? हे तीन दिवसानंतर शुक्रवारी (४ मे) रात्री उशिरापर्यंत महापालिका प्रशासनाला समजू शकलेले नव्हते. तसेच या तरूणाची ओळख देखील अद्याप पटलेली नाही. 

शवविच्छेदनातून या तरूणाला कावीळ झाल्याचे उघड झाले आहे. त्यातूनच याचा मृत्यू झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे. मात्र, दोन दिवसानंतरही या तरूणाची ओळख पटलेली नसून, त्याला वायसीएममध्ये कोणी आणून सोडले हे देखील अद्याप उघड झालेले नाही. मात्र या सगळ्या प्रकारातून महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला.

Tags : unknown person, body, ycm hospital, pimpari chinchavad, pune news