Tue, Mar 26, 2019 12:10होमपेज › Pune › प्राधिकरण ‘पीएमआरडीए’मध्ये विलीन करणे अन्यायकारक 

प्राधिकरण ‘पीएमआरडीए’मध्ये विलीन करणे अन्यायकारक 

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 15 2018 11:34PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ‘पीएमआरडीए’त (पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरण)  विलीन करण्याचा निर्णय हा पिंपरी-चिंचवडकरांवर अन्याय असून त्यास शिवसेनेचा विरोध असल्याचे श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे. पिंपरी चिंचवड प्राधिकरणाकडे असणार्‍या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी व हजारो कोटीची जमीन यावर डोळा ठेवून हा निर्णय घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणात विलीनीकरण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी घेतल्याचे काल पालक मंत्री गिरीश बापट यांनी एम्पायर इस्टेट पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात सांगितले होते. या विलीनीकरणास बारणे यांनी विरोध दर्शविला आहे. 

यासंदर्भात खा. बारणे यांनी म्हटले आहे की, शहरातील गरीब कामगारांना घरे व स्वस्तात  घरे देण्यासाठी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची सन 1972 मध्ये स्थापना झाली. मात्र या संस्थेचा ताबा धनिकांनी घेतला. कवडी मोल किमतीमध्ये शेतकर्‍यांच्या जमिनी घेऊनही आजतागायत 1984 पूर्वीच्या शेतकर्‍यांना जमिनीचा 12.5 टक्के परतावा मिळालेला नाही. मागच्याच सरकारची री हे सरकार ओढत आहे. प्राधिकरण क्षेत्रामधील जागेवर खरेदी खते करून मुळ शेतकर्‍यांकडून जागा घेऊन गरीब नागरिकांनी घरे बांधली आहेत. त्या घरांना रस्ते, लाईट, पाणी या सुविधा पालिकेने दिल्या आहेत. अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची घोषणा या सरकारने केली.  मात्र मोठ्या प्रमाणावर दंड व जाचक अटीमुळे नागरिकांनी पाठ फिरविली.

पुणे महानगर विकास प्राधिकरणाची स्थापना 2015 साली झाली. मात्र या संस्थेचा  कारभार हा कागदावरच राहिला आहे. पिंपरी चिंचवड विषयी आकस असल्याने या नेत्यांनी संस्थेचे कार्यालय पुण्यात स्थलांतरित केले. ‘पीएमआरडीए’ क्षेत्राच्या विकासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात बैठक घेवून पुणे क्षेत्रातील रस्ते विकासाची घोषणा केली. पिंपरी चिंचवड प्राधिकरणाकडे असलेला पैसा या विकास कामाकडे उपयोगी ठरणार असल्याचे दिसते. प्रधिकरण विलीनीकरणाचा निर्णय हा संधीसाधुपणाचा असल्याची टीका बारणे यांनी केली आहे.