पुणे : प्रतिनिधी
१४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणा-या ४५ वर्षीय चुलत चुलत्याने जीवे मारण्याची धमकी देऊन वर्षभर बलात्कार केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सांडभोरवाडी(तिन्हेवाडी), येथे घडली आहे. दुष्कृत्य करणा-या या चुलत्याला पोलिसांनी अटक केली आहे. पिडीत मुलगी सुमारे पाच महिन्यांची गर्भवती असून पोटात दुखू लागल्यावर हा प्रकार समोर आला आहे.
पिडीत मुलीचे आई वडील रोजंदारी करून उदरनिर्वाह करतात. आई, वडील घराबाहेर पडल्यावर, शाळेला सुटी असल्यावर ही मुलगी घरात एकटी असायची. आरोपी घरात जाऊन टीव्ही पाहायच्या नावाखाली बराच वेळ बसायचा, कधी झोपायचा. जवळचे नाते आणि शेजारी असल्याने कोणीही आक्षेप घेतला नाही. सुरुवातीचे तीन महिने त्याने हेच केले. मात्र त्यानंतर त्याने एक दिवस घराचा दरवाजा आतून बंद केला. मुलीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत त्याने बलात्कार केला. भीती पोटी मुलीने ही बाब कोणालाही सांगितली नाही. त्याचा गैरफायदा घेत नराधम चुलत्याने सलग वर्षभर अनेकदा बलात्कार केला. त्यातून या मुलीला दिवस गेले. आठ दिवसांपूर्वी पोटात दुखू लागल्यावर पालकांनी तिला दवाखान्यात नेले. त्यावेळी ही बाब समोर आली. गुरुवारी (दि३१) खेड पोलिस ठाण्यात बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपीला पिडीत मुलीच्या वयाच्या तीन मुली आहेत. त्याने केलेल्या कृत्यामुळे गाव, परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव, सह निरीक्षक आदित्य लोणीकर अधिक तपास करीत आहेत.
Tags : pune news, khed, uncle rape his Cousin, crime, crime news