Sat, Apr 20, 2019 15:50होमपेज › Pune › परदेशी पाहुण्यांची ‘उजनी’कडे पाठ

परदेशी पाहुण्यांची ‘उजनी’कडे पाठ

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 1:07AM

बुकमार्क करा
अमोल साळवे :राजेगाव

 परदेशी पाहुण्यांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यात पसरलेल्या अवाढव्य उजनी जलाशयात अमेरिका व युरोप खंडातील प्रसिद्ध फ्लेमिंगो पक्ष्यांनी पाठ फिरविल्यामुळे पर्यटकांसह पक्षिप्रेमींसाठी नववर्षाच्या सुरुवातीला नाराजीची वेळ आलेली आहे.

उजनी जलाशयातील भिगवण, डिकसळ, कुंभारगाव, डाळज, पळसदेव ही राष्ट्रीय महामार्गावरील गावे फ्लेमिंगो व चित्रबलाक पक्ष्यांसाठी पर्यटकस्थळे म्हणून ओळखली जातात. थंडीच्या दिवसात उजनी जलाशयात आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी असते, त्यामुळे उजनी जलाशयाने पर्यटकांच्या नजरेत वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र, कालावधी संपूनही परदेशी पाहुणे अजूनही न आल्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून स्वागतासाठी सज्ज झालेले उजनी जलाशय फ्लेमिंगो पक्ष्यांच्या प्रतीक्षेत आहे असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.  

हवामान बदलामुळे साधारणतः नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत युरोप व अमेरिका खंडातील पक्षी आशिया खंडात स्थलांतर करतात. याच कालावधीत आशिया खंडात हवामान युरोप व अमेरिका खंडांच्या तुलनेत कमी थंडीचे असते, म्हणून थंडीपासून संरक्षण करण्यासाठी फ्लेमिंगो पक्षी विशेषतः महाराष्ट्रातील बहुतांश जलाशयाच्या ठिकाणी स्थलांतर करताना दिसतात. 

अभ्यासकांच्या मतानुसार हवामान बदलामुळे फ्लेमिंगो पक्षी कमी प्रमाणात भारतात दाखल झाले आहेत, त्यापैकी उजनी काठावर 25 ते 30 एवढे कमी फ्लेमिंगो पक्षी क्वचित पाहायला मिळत आहेत. पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे पक्षांना काठावर फिरण्यासाठी जागा नाही, त्याचाही फटका पक्षांना बसलेला दिसत आहे.

तसेच ज्या ठिकाणी पक्षी दरवर्षीप्रमाणे येतात त्याठिकाणी मासेमारी केली जात आहे, त्यामुळे मनुष्य सहवास वाढल्यामुळे शांतताभंग होऊ लागली आहे, त्यामुळे फ्लेमिंगो पक्षी बुजत आहेत, असे चित्र उजनी जलाशयाच्या काठावर पाहायला मिळत आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला पर्यटक पक्षांच्या कवायती पाहायला आतुरले आहेत, मात्र पक्षांचे आगमन अजूनही झालेले नाही. याचाच फटका पर्यटकांवर झालेला पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी फ्लेमिंगो पक्षांच्या स्वागतासाठी जणू उजनी जलाशय आतुरले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.