Tue, Jun 18, 2019 21:18होमपेज › Pune › आरक्षणप्रश्‍नी जनता धडा शिकवेल : उदयनराजे

आरक्षणप्रश्‍नी जनता धडा शिकवेल : उदयनराजे

Published On: Aug 04 2018 1:35AM | Last Updated: Aug 04 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी

राज्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू असून, अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आरक्षणासाठी लोक रस्त्यांवर उतरले आहेत. त्यांच्या भावना समजून घेण्याची गरज आहे. मराठा समाजाला तत्काळ आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन आरक्षणाचा प्रश्‍न सोडवावा; अन्यथा आगामी निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवेल, असा इशारा खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.  मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांची उदयनराजे यांनी शुक्रवारी भेट घेतली व त्यांना राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

राज्यात 58 मूक मोर्चे निघाले होते. त्यात लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे नागरिक सहभागी झाले होते. त्या मोर्चांच्या तुलनेत सध्या राज्यात निघणारे मोर्चे लहान आहेत. तरीही या आंदोलनांना हिंसक वळण लागले. हे हिंसक वळण का लागले, याचा विचार सरकारने करण्याची गरज आहे. आरक्षण मिळावे, इतकीच समाजाची माफक अपेक्षा आहे. मराठा समाजाच्या वेदना समजून न घेता पोलिसांनी आंदोलकांवर दरोडा आणि खुनाचा प्रयत्न, यासारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलकांवरील हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी सूचना करत गुन्हे मागे न घेतल्यास मोठा भडका उडेल, असा इशाराही उदयनराजे यांनी यावेळी दिला.

सत्तेत असताना हा प्रश्‍न का सोडविला नाही?
सत्तेत असलेल्या आणि आता सत्तेत नसलेल्या राजकीय नेत्यांनी एकत्रित येऊन गांभीर्याने हा प्रश्‍न सोडविला पाहिजे. आज विरोधी पक्ष म्हणतोय आरक्षणाचा प्रश्‍न सोडवा, मग तुम्ही सत्तेत असताना हा प्रश्‍न का सोडविला नाही? आरक्षणाचा विषय यापूर्वीच मार्गी लागला असता, तर अनेकांचे जीव गेले नसते, ज्या घरातील व्यक्ती जाते त्याच्या कुटुंबावर काय प्रसंग ओढवतो, याचा विचार न केलेला बरा, असेही उदयनराजे म्हणाले.