Wed, Jul 17, 2019 08:47होमपेज › Pune › पुणे : लिफ्टमध्ये अडकलेल्या दोन तरुणांना जीवदान

पुणे : लिफ्टमध्ये अडकलेल्या दोन तरुणांना जीवदान

Published On: Aug 13 2018 11:19PM | Last Updated: Aug 13 2018 11:19PMपुणे : प्रतिनिधी

येवलेवाडी कमानी लगत श्री सृष्टी अपार्टमेंट या अकरा मजली इमारतीत चौथ्या मजल्यावर लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने वायर रोप तुटल्याने थेट लिफ्टमध्ये अडकलेल्या दोन तरुणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.

येवलेवाडी येथे इमारतीच्या  लिफ्टचा वायर रोप तुटल्याने दोन तरुण अडकल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर तातडीने कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्राचे वाहन व शीघ्र कृती दलाला रवाना करण्यात आले. दलाचे जवान पोहचताच त्यांनी चौथ्या मजल्यावर जाऊन पाहणी केली. तर घटना गंभीर असल्याचे जाणवले. लिफ्टचा वायर रोप तुटून लिफ्ट सेफ्टि वायर रोपवर अडकली होती व दोघे तरुण भेदरलेल्या स्थितीत होते. तिथे लिफ्टचे कर्मचारी देखील आले होते. 

यानंतर तातडीने निर्णय घेऊन दलाच्या जवानांनी दलाकडील मनेला रोपच्या साह्याने लिफ्टच्या लोखंडी चॅनलला बांधून तो रोप बाहेर एका मजबूत रिलिंगला बांधून ठेवला व सदर तरुणांना लिफ्टचा दरवाजा उघडून सुखरुप बाहेर काढले. नंतर मनेला रोप हळूच सोडला असता लिफ्ट बेसमेंटला जाऊन थांबली. दोघे तरुण हे पुणे शहराच्या बाहेरचे असून शिक्षणाकरिता येथे आले आहेत. या बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर ते भाडेतत्वावर राहत आहेत.

दोघा तरुणांची दलाच्या जवानांनी अवघ्या पंधरा मिनिटात सुखरुप सुटका करुन एक प्रकारे जीवदानच दिले. लिफ्टचा रोप पूर्णपणे तुटला असता तर मोठा अनर्थ घडला असता. या कामगिरीमधे तांडेल सुभाष जाधव तसेच वाहन चालक सुखदेव गोगावले व जवान अजित शिंदे, विशाल यादव शीघ्र कृती दलाचे राहुल जाधव, प्रदीप कोकरे, ओंकार ताटे यांनी सहभाग घेतला.