Wed, Jul 17, 2019 00:46होमपेज › Pune › पोलिस आयुक्तालयासाठी एक नव्हे, दोन जागा

पोलिस आयुक्तालयासाठी एक नव्हे, दोन जागा

Published On: Jun 25 2018 1:51AM | Last Updated: Jun 25 2018 1:00AMपिंपरी : प्रतिनिधी

शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय 15 ऑगस्टला सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पालिकेने चिंचवडमधील प्रेमलोक पार्क मधील शाळेसह निगडीतील से. 24 मधील अंकुश बोर्‍हाडे विद्यालयाची इमारत देण्यात येणार आहे. सेक्टर 10 मधील क्‍लब हाऊसची जागेचा विषय उपसूचनेद्वारे मागे घेण्यात आला. 

पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. पोलिसांनी पिंपरी-पालिकेकडे पोलिस आयुक्तालयासाठी प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले इंग्रजी शाळेच्या इमारतीची मागणी केली होती. त्यानुसार पालिकेने सदर इमारत देण्यास पूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी आणखी दोन इमारत व जागेची मागणी पालिकेकडे केली होती. त्या दोन जागा पोलिस उपायुक्त कार्यालय, हत्यार विभाग व इतर गोष्टीसाठी मागितली आहे.

तसे पत्र उपायुक्त गणेश शिंदे यांनी पालिकेस दिले आहे. चिंचवड येथील झेप पुनर्वसन केंद्र या संस्थेला निगडीतील सेक्टर 24 मधील अंकुश बोर्‍हाडे विद्यालय नाममात्र भाड्याने देण्याचा विषय सभेपुढे मान्यतेसाठी होता. त्या विषयाला  नामदेव ढाके यांनी उपसूचना दिली. सदर जागा झेप संस्थेऐवजी पोलिस आयुक्तालयास द्यावी. तसेच, सेक्टर 10 मधील क्‍लब हाऊस व मोकळी जागाही आयुक्तालयास द्यावी. त्यावर योगेश बहल यांनी सदर विषय सविस्तर स्पष्ट करण्याची मागणी केली. माहिती देताना सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले की, प्रेमलोक पार्कची शाळा पोलिस आयुक्तालय कार्यालयासाठी दिली आहे.

तसेच, सदर दोन जागा इमारतींची पोलिसांना आवश्यकता असून त्या दिल्या जात आहेत. झेप संस्थेला मासुळकर कॉलनीतील तंत्रनिकेत शाळेची इमारत दिली जाईल. तेथील क्रीडा विभाग चिंचवड येथील मैदानाजवळ हलविण्यात येणार आहे. सेक्टर 10 मधील जागा परिसरातील मुलांना खेळण्यासाठी विकसित केली असून, ती आयुक्तालयास देण्यास  सीमा सावळे यांनी विरोध दर्शविला. सदर जागा उपसूचनेतून वगळण्याची मागणी त्यांनी केली. त्याला राष्ट्रवादीचे  विक्रांत लांडे यांनी अनुमोदन दिले. विलास मडिगेरी म्हणाले की, पोलिसांनी शहरातील 3 ते 4 जागा व इमारती मागणी पालिकेकडे केली आहे. त्यानुसार ही कारवाई केली जात आहे. से. 10 मधील क्‍लबहाऊस प्राधिकरणाने विकसित करून पालिककडे हस्तांतरीत केले आहे.पोलिस बंदोबस्तासाठी शुल्क घेतात. मग त्यांना नाममात्र दराने इमारत व जागा का उपलब्ध करून दिली जात आहे, असा सवाल सेनेचे राहुल कलाटे यांनी उपस्थित केला.