Sun, Mar 24, 2019 16:46होमपेज › Pune › ‘भीमाशंकर’ला सव्वादोन लाख भाविक

‘भीमाशंकर’ला सव्वादोन लाख भाविक

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 21 2018 12:11AMभीमाशंकर : वार्ताहर

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे संततधार पाऊस व दाट धुक्यात ‘हर हर महादेव’च्या जयघोषात सव्वादोन लाख भाविकांनी दर्शनबारीत उभे राहून शिवलिंगाचे दर्शन घेतले. आठवडाभर सुटी असल्याने भाविकांचा ओघ सुरू होता. आठवड्यात सुमारे पाच लाख भाविकांनी दर्शन घेतले. तर सुटीच्या दिवशी पर्यटक मद्यपान करून दर्शनाला येत असल्याने भीमाशंकरचे पावित्र्य राखण्यासाठी मद्यपान न करण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी केले.

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पहाटे 4 वाजता भाविकांसाठी मंदिर खुले केले होते. पहाटेपासून दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. दर्शनासाठी एमटीडीसी फॉरेस्ट थांब्यापर्यंत रांग गेली होती. भीमाशंकर देवस्थानाच्या वतीने गाभारा व मंदिर परिसरात पोलिस व देवस्थानाच्या सुरक्षारक्षकांमार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुख दर्शनासाठी वेगळी सुविधा करण्यात आल्याने गर्दी नियंत्रणात आली होती. दर्शन पासची सुविधा असल्याने भाविकांना सुलभ दर्शन उपलब्ध झाले. दुपारपर्यंत भाविक भीमाशंकरला येत होते. दर्शनबारीसाठी दोन किलोमीटर रांग लागली होती. पोलिसांकडून चोख बंदोबस्तात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बॅगांची तपासणी करण्यात येत होती. देवस्थानचे कार्यकारी विश्‍वस्त व तहसीलदार अर्चना यादव, आंबेगावचे तहसिलदार रविंद्र सबनिस यांनी यात्रा काळाची दिवसभर नियोजन व्यवस्था केली. यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 18 पोलिस निरीक्षक, 220 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

वाहनतळ क्र.4 वर एसटी व मोठ्या लक्झरी गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. तर चार चाकी वाहने दोन नंबरवर व दुचाकी वाहने एक नंबरवर वाहनतळावर थांबवत होते. खासगी 30 मिनीबसची सोय करण्यात आली होती. तरीही गर्दी असल्याने भाविकांना चार किलोमीटर पायी जावे लागत होते. भीमाशंकर यात्रेसाठी शिवाजीनगर, स्वारगेट, भोर, शिरूर, नारायणगाव, राजगुरुनगर, पिंपरी-चिंचवड या आगारांमधून 35 जादा गाड्यांची सोय करण्यात आली होती. 

आळंदी येथील स्वकाम सेवा मंडळाचे 30 महिला व पुरुष कार्यकर्ते रविवारी दुपारपासून मंदिर परिसर व दर्शनबारी स्वच्छ करण्याचे काम करत होते. भीमाशंकर वन्यजीव विभाग ग्रामविकास समिती कोंढवळ, भोरगिरी यांच्या मार्फत 10 वनरक्षक, 30 समितीचे सदस्य वन क्षेत्र नाक्यापासून ते भीमाशंकर पर्यंत कचरा गोळा करणे, मंदिर परिसर स्वच्छता, जमा होणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावणे, पथकर नाक्याची वसुली करण्यासाठी कर्मचारी तैनात होते.