Fri, Jul 19, 2019 22:03होमपेज › Pune › ट्रकच्या धडकेत दोघे ठार

ट्रकच्या धडकेत दोघे ठार

Published On: Jun 13 2018 1:35AM | Last Updated: Jun 13 2018 12:01AMलोणावळा : वार्ताहर 

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दोघे जण ठार झाले असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी  (दि. 12) सकाळी सव्वादहाच्या सुमारास खंडाळा (बोरघाट) घाटातील अमृतांजन पुलाजवळील तीव्र उतारावरील वळणावर झाला. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती.

मोहम्मद सल्लाउद्दीन (31), बाबूभाई नवाज (31, दोघेही रा. बसवकल्याण, बिदर, कर्नाटक) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर गंभीर जखमींमध्ये नबीउद्दिन अधुनी (26, रा. बसवकल्याण, बिदर, कर्नाटक), मोहम्मद आझाद (34, रा. तमिळनाडू) यांचा समावेश आहे. 

दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद, बाबूभाई आणि नबीउद्दीन हे तिघे जण त्यांच्या वाहनाने काही कामानिमित्त मुंबईला चालले होते. यादरम्यान त्यांचे वाहन खंडाळा बोगदा आणि अमृतांजन पुलाजवळ बंद पडले. यावेळी ते  नाष्टा व चहा पिण्यासाठी दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलिस चौकीकडे द्रुतगती मार्गावरून चालले होते. यादरम्यान पुण्याहून मुंबईकडे सागवान लाकडे घेऊन जाणारा ट्रक क्र. (टीएन 52 एफ 4746) या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले व रस्त्याने चालत असलेल्या मोहम्मद, बाबूभाई आणि नबीउद्दिनला ठोकरले. त्यानंतर ट्रक मार्गालगतच्या डोंगरावर आदळून मार्गावरच उलटला. या घटनेत एकाचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दोघेजण  गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती कळताच दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलिस, आयआरबीचे देवदूत आपत्कालीन पथक आणि महामार्गावरील गस्ती पथकाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना तत्काळ उपचारासाठी निगडीतील लोकमान्य रुग्णालयात नेण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातामुळे मार्गावर सांडलेल्या ट्रकच्या ऑईलमुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन महामार्ग पोलिस व आयआरबीच्या कर्मचार्‍यांनी  त्यावर माती टाकून साफसफाई केली. त्यानंतर बारा वाजता वाहतूक सुरू करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास खोपोलीचे पोलिस करीत आहेत.