Thu, Aug 22, 2019 04:04होमपेज › Pune › पुणे : फक्त चारशे रुपयांसाठी मित्रांनीच केला ‘त्या’ दोघांचा खून

पुणे : फक्त चारशे रुपयांसाठी मित्रांनीच केला ‘त्या’ दोघांचा खून

Published On: Jul 28 2018 9:41PM | Last Updated: Jul 28 2018 9:41PMपिंपरी : प्रतिनिधी 

अवघ्या चारशे रुपयांच्या वादातून पाच जणांनी मिळून मित्र आणि मैत्रिणीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या दुहेरी हत्याकांड प्रकरणात पाचजणांना अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सोनाली उर्फ मॅक्स वाकडे (३३, रा. ओटास्किम निगडी) आणि सलमान शब्बीर शेख (२०, रा. देहूरोड) या दोघांचा खून करण्यात आला आहे. रवी मानसिंग वाल्मिकी (३२, रा. देहूरोड), नागेश शिलामन चव्हाण (२३, रा. आकुर्डी), विशाल महिंद्र वाल्मिकी (२७, रा. देहूरोड),  सचिन रोहिदास चव्हाण (२३, रा. रुपीनगर, तळवडे) आणि प्रशांत शशिकांत साळवी (२५, रा. देहूरोड) यांना अटक करण्यात आले आहे.     
रविवारी (दि.२२) रोजी सकाळी दहाच्या सुमारास सोनालीचा मृतदेह केजुदेवी बंधार्‍यात मिळून आला होता. एका अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यात आढळून आल्याची बातमी सोनालीच्या भावाने फेसबुकवर  वाचली. त्याने यशवंतराव चव्हाण रूग्णालयात जाऊन पाहणी केली. सोनालीच्या मानेवर ‘रोहन’असे गोंदण असल्याने ती महिला सोनाली असल्याची ओळख पटली. 

सोनालीच्या भावाने वाकड पोलिसांना ती १९ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास एका मित्रासोबत घराबाहेर पडल्याचे सांगितले. वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपासाची चक्रे फिरवून आरोपींचा नावे निष्पन्न केली. एकीकडे वाकड पोलीस आरोपींच्या मागावर असतानाच निगडी पोलीस ठाण्यातील फारूक मुल्ला यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून त्या आरोपींचा ठावठिकाणा मिळाला. त्यांनी तात्काळ आरोपींना ताब्यात घेतले. 

पुढाल चौकशीत मृत सलमान आणि आरोपी रवी वाल्मिकी यांचा चारशे रुपयावरून वाद झाल्याची माहीती समोर आली. रवीच्या डोक्यात सलमानविषयी प्रचंड राग होता. १९ जुलै रोजी रवीच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने सर्वजण पार्टी करण्यासाठी तळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सांगवडे येथे गेले. सांगवडे येथील स्मशानभूमीमध्ये दारू पिल्यानंतर त्या दोघांच्यात पुन्हा वाद झाला. रवीने इतर मित्रांच्या मदतीने सलमानचा गळा आवळून खून केला व  त्याचा मृतदेह तेथील झुडपात टाकून दिला. त्यानंतर आरडाओरडा करणार्‍या सोनालीचा गळा दाबून तिचा मृतदेह पाण्यात टाकून दिल्याची कबुली दिली. 

ही कामगिरी निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र जाधव, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, लक्ष्मण सोनवणे, कर्मचारी मंगेश गायकवाड, राम साबळे, फारूक मुल्ला, नितीन बहिरट, जमीर तांबोळी, शरीफ मुलाणी, आनंद चव्हाण, स्वामिनाथ जाधव यांच्या पथकाने केली.

‘पुढारी ब्रेकींग’ नंतर पळापळ...

सोनाली उर्फ मॅक्सची ओळख पटली असून तिचा घातपात झाला असण्याच्या शक्यतेची बातमी सर्वप्रथम ‘पुढारी ऑनलाईनवर’ ब्रेक करण्यात आली. ही बातमी ‘फ्लॅश’ होताच वाकड पोलिस खडबडून जागे झाले. त्यांनी आरोपींच्या शोध सुरु केल्यानंतर निगडी पोलिसांनी देखील खबरी नेटवर्क सतर्क केले. वाकड पोलिसांनी आरोपींची नावे निष्पन्न केली होती. मात्र, ते आरोपीपर्यंत पोहोचण्याआधीच निगडी पोलिसांनी बाजी मारली व गुन्ह्याचा उलगडा केला.