Wed, Jan 16, 2019 11:17होमपेज › Pune › राज्यात आणखी दोन दिवस थंडीचा कडाका

राज्यात आणखी दोन दिवस थंडीचा कडाका

Published On: Dec 30 2017 5:22PM | Last Updated: Dec 30 2017 5:22PM

बुकमार्क करा
पुणे: प्रतिनिधी 

गेल्या ४-५ दिवसांपासून राज्यभर असणारा थंडीचा कडाका आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे नवे क्षेत्र सोमवारी (दि. १) निर्माण होण्याचा अंदाज आहे. यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये मंगळवारपासून (दि. 2) अंशतः ढगाळ वातावरण तयार होणार असून थंडीचा कडाका कमी होईल. रविवारी व सोमवारी मात्र बोचरी थंडी कायम राहणार असल्याचेही हवामान विभागाने नमूद केले आहे. 

दरम्यान, राज्याच्या सर्वच भागांमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी शनिवारी देखील कायम होती. नीचांकी किमान तापमानाची नोंद विदर्भातील गोंदिया येथे ७.२ अंश सेल्सिअस एवढी करण्यात आली. तर नाशिक ८.८, पुणे ९.४, मुंबई १६, रत्नागिरी १६.५, जळगाव १०.६, कोल्हापूर १४.३, महाबळेश्‍वर १३, सांगली ११.७, सातारा १०.५, औरंगाबाद ९.२, नागपूर ९.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. उत्तर भारतात थंडीचा कहर शनिवारी देखील सुरूच होता. अनेक ठिकाणी धुक्यामुळे वाहतूक कमालीची मंदावल्याचे पाहायला मिळाले. राजधानी दिल्लीत ७.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली.